मालवण : समाजवादी नेते ज्ञानेश देऊलकर यांचे निधन झाले. यात कोणाचे गुरुजी गेले, कोणाचे मार्गदर्शक गेले अशा भावना त्यांनी घडविलेल्या शिलेदारांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्गाचे पालकत्व हरपल्याने जिल्ह्याची मोठी वैचारिक हानी झाली आहे. देऊलकर यांचा वैचारिक पाया नेहमीच भक्कम राहिल्याने त्यांच्या संस्कार व पुरोगामी विचारांची असलेली मजबूत सांगड जिवंत ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना अॅड. देवदत्त परुळेकर यांनी व्यक्त केली.ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच मच्छिमार नेते ज्ञानेश देऊलकर यांचे ७ मार्च रोजी निधन झाले. याबाबत शुक्रवारी मामा वरेरकर नाट्यगृह येथे नागरी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, नगरसेवक नितीन वाळके, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, सेजल परब, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दिगंबर सामंत, दिलीप घारे, छोटू सावजी, श्रीधर काळे, संजय वेतुरेकर, डॉ. सारंग कुलकर्णी, रविकिरण तोरसकर, ज्योती तोरसकर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना देऊलकर यांची चित्रफीत व छायाचित्रे दाखविण्यात आली. ज्योती तोरसकर यांनी शोकपत्रांचे वाचन केले, तर शोकसभेचे सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले. गौरी सामंत यांच्या पसायदान गीताने श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी आम्हा मच्छिमारांचा आधारवड हरपला, अशा भावना मच्छिमार नेते व मान्यवरांनी जड अंत:करणाने व्यक्त केल्या. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी देऊलकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. उपस्थितांनी आपले विचार प्रकट करताना देऊलकर यांचे लाभलेले मार्गदर्शन व सहवासाचे वर्णन केले. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक ते मच्छिमार नेते या जीवन प्रवासात अनेक लढे उभारले. अभ्यासू मांडणी करत अनेक समस्यांना वाचा फोडली. पर्ससीन मासेमारी बंदी हा त्यांच्या लढ्याचा विजय आहे, असेही भावोद्गार व्यक्त करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शोकपत्रातून भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)महान व्यक्तीत ‘मी पणा’ नव्हता अॅड. परुळेकर म्हणाले, शिक्षकीपेशा सांभाळताना त्यांनी पांढरपेशा वर्गाशी नाते जोडले नाही. उलट समाजातील दुर्बल घटकाला आपलेसे केले. त्यांच्या एवढ्या महान कार्यात ‘मी पणाचा’ अहंकार नव्हता. त्यांचे विचार चिरकाल टिकविणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळी शिक्षक भारती परिषदेचे संजय वेतुरेकर यांनी देऊलकर यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केला जाईल, असे जाहीर केले.लढ्याचा शेवट विजयानेवैभव नाईक म्हणाले, राज्यपालांनी अभिभाषणात पर्ससीन बंदीमुळे मत्स्योत्पादनात वाढ झाली आहे, असे स्पष्ट केले. यात देऊलकर यांचे मोठे योगदान असून त्यांच्या लढ्याचा शेवट विजयाने झाला. डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, अंदमान ते मालवण या सागरी प्रवासात देऊलकर सरांचा मोठा वाटा आहे. पारंपरिक मच्छिमारांसाठी ते ऊर्जाशक्ति होते, असेही ते म्हणाले.
देऊलकरांचा वैचारिक पाया भक्कम ठेवू
By admin | Published: March 11, 2017 8:34 PM