अजय लाड - सावंतवाडी -कोकणचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्हाभरात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होते. यामुळे छोटीमोठी भांडणे तसेच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. त्यावेळी आपणास आठवतात ते रस्त्याच्या कडेला ऊनापावसाचीही तमा न करता गणेशोत्सव कालावधीत समाजातील वाईट प्रवृत्तींना दूर ठेवत शांतता व शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी दिवसरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांची. तुमच्या आमच्यातील या पोलिसांनी जनसेवेचे व्रत स्वीकारलेले आहे. बाप्पाप्रमाणेच सर्वसामान्यांवरील विघ्नांना दूर सारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या या पोलिसांना सलाम.गणेश उत्सवात सर्वांचाच उत्साह व्दिगुणित झालेला असतो. गणेशाच्या तयारीपासून आगमनानंतर, त्याच्या विसर्जनापर्यंत सर्व घरातील वातावरण मंगलमय बनलेले असते. याचा प्रत्यय आपण सारे घेतच असतो. परंतु, समाजातील तुमच्या आमच्यातील एक घटक असलेले हे पोलीस बांधव मात्र, 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याप्रमाणेच सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे दिसतात. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेवेळी पोलीस झोपले होते का, अशा प्रतिक्रिया येतात. त्यांनाच टीका सहन करत टीकेचे धनी व्हावे लागते. असे असताना जर गणेशोत्सव वा अन्य सणासुदीच्या काळात त्यांच्या चांगल्या योग्य नियोजनबद्ध कार्यपद्धतीबाबत व चांगल्या कार्यक्षमतेबाबत चार कौतुकाचे शब्द याच समाजातील लोकांकडून का बाहेर पडत नाहीत, याचेही आश्चर्य वाटते. समाजाची हीच रीत आहे. कितीही चांगले काम केले तरीही वाईट घटनांवेळी ते सारे विसरले जाते. मात्र, कोकणच्या आराध्य देवतेचा हा उत्सव शांततेने व सुरक्षिततेत आपण या पोलिसांच्या पहाऱ्यामुळे साजरा करत आहोत. त्यांच्यामुळेच या उत्सवाचा पुरेपूर आनंद आपणा सर्वांना घेता येत आहे.सावंतवाडी शहरासह जिल्हाभरात पोलीस विभागातर्फे नियोजन करत शांतता व सुव्यवस्था राखण्यात यश प्राप्त केले आहे. लाखोंच्या घरात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह जिल्ह्यातील भक्तांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली असतानाही गाड्यांच्या पार्किंगपासून वाहतूक नियंत्रित करण्यात आली. आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवतानाच भाविकांच्या उत्साहावर पाणी पडणार नाही, यासाठी शांतता राखण्याचे कामही पोलिसांनी केले आहे. सावंतवाडी शहरातील पोलिसांसमवेत सुमारे ३७ होमगार्ड, २१ सायकींग फोर्सचे जवान, जिल्ह्याबाहेरील ९ पोलीस अधिकारी व राज्य वाहतूक नियंत्रण विभागातर्फे ६ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीही उत्सवाच्या कालावधीत दिवसरात्र पहारा देत समाजाची सेवा केली आहे.जिल्ह्यातील शांतता, सुरक्षा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दल करत आहे. गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी त्यांचेही मन कासावीस होत असते. परंतु, समाजसेवेतच देवाला शोधणाऱ्या या पोलिसांचे थोडेतरी उपकार समाजाने मानावेत. जेवणाखाण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नसतानाही कधीतरी बिस्कीट तर केव्हातरी वडापाव खाऊन समाजसेवेचे व्रत त्यांच्याकडून पाळले जात आहे.
सर्वसामान्यांवरील विघ्नांना दूर सारण्यासाठीपोलिसांचा दिवस-रात्र पहारा
By admin | Published: August 31, 2014 9:29 PM