सावंतवाडी : दीपक केसरकर हे फक्त घोषणा मंत्री आहेत. गेल्या तेरा वर्षात आमदार व मंत्री पदाच्या काळात त्यांनी घोषणा करण्याच्या पलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या घोषणा आणि अर्धवट कामांचा निषेध करण्यासाठी १ एप्रिलला प्रत्येक अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी “एप्रिल फुल” आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला.
ते शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बंड्या घोगळे, निशिकांत पडते, आबा सावंत, राजू शेटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.डिसोझा म्हणाले, राजन तेलींनी आमदार हटाव आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.भविष्यात ठाकरे गटाच्या माध्यमातून सुद्धा आमदार हटाव आंदोलन करण्यात येणार आहे. केसरकर यांनी गेल्या अनेक वर्षात अनेक घोषणा केल्या आहेत. सद्यस्थितीत तेरा वर्ष त्यांच्या आमदारकीला झाली आहेत. परंतु आश्वासना आणि घोषणांच्यापलीकडे त्यांनी मतदारसंघात काही केले नाही. त्यामुळे त्यांना आता घोषणामंत्री म्हणून आम्ही उपाधी देण्याचा निर्णय घेतला आहे. केसरकारांनी ज्या ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि ते प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी “एप्रिल फुल” आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी बॅनर लावून केसरकरांचा निषेध करण्यात येणार असल्याचे डिसोजा यांनी सांगितले.रोजगार उभारण्यात येणार असे सांगून चष्म्याचा कारखाना आणतो, काथ्या उद्योग अशा अनेक वल्गना केल्या. आंबोलीचा विकास केल्याचे सांगितले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणणार असल्याचे सांगितले. परंतु अद्याप एकही वीट त्या ठिकाणी लागलेली नाही. केवळ घोषणा करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. ही वस्तुस्थिती आहे.