चिपळूण तालुक्यातील केतकी गावाचे एक टोक खाडीला, तर दुसरे टोक उंच डोंगरावर आहे. विखुरलेल्या गावातील भागणेवाडी व बौध्दवाडी या जवळजवळ असलेल्या दोन वाड्यांमध्ये अनेक वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने टँकरने पाणी पुरवठा होत असे. लोकप्रतिनिधींचा विकासाचा ध्यास, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग व शासकीय अधिकारी यांचे सहकार्य अशा सांघिक प्रयत्नांमुळे केतकी गाव टँकरमुक्तीकडे वाटचाल करणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियान पाणी सर्वांसाठी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत गावाचे भौगोलिक क्षेत्र ३१३.७० हे असून, गावाची लोकसंख्या ६९० इतकी आहे. गावात तृणधान्य, कडधान्ये, भाजीपाला व फळपिके घेतली जातात. यापैकी बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू (पावसाच्या पाण्यावर अवलंबून) आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या वाड्यातील व गावातील लोकांचा सहभाग घेऊन सर्वेक्षण (शिवार फेरी) करुन लोकांना अत्यावश्यक वाटणारी जलस्रोत बळकटीकरण, शेततळे, सिमेंट नाला बांधमधील गाळ काढणे, सलग समतल चर, वळण बंधारा, सिमेंट नाला बांध, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष, सेंद्रिय खत निर्मिती नाडेप युनिट, रोहयो फळबाग लागवड व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मंजूर मृद व जलसंधारणाची कामे सूचवण्यात आली. काही कामे गतिमान पाणलोट, सी. एस. आर. व महात्मा फुले जलभूमी अभियान इत्यादी योजनांमधून सूचविण्यात आली. सी. एस. आर.अंतर्गत एक्सेल इंडस्ट्रीज लि. यांच्यामार्फत जलस्रोत बळकटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. जलस्रोत बळकटीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध झाले. बळकटीकरणाचे कामापूर्वी जलस्रोताचे पाणी उघड्यावर असल्याने पाण्यात झाडांची पाने व इतर धूळ मिसळून पाणी अशुध्द राहात असे. आता जलस्रोत बळकटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने अतिशय शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच पुढील वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामात कडधान्य व भाजीपाला यासही पाणी पुरेल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ठिबक, तुषार सिंचन करुन विविध पिके घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार वृषाली पाटील यांनी केतकी गाव दत्तक घेतल्याने गावाचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कृषी पर्यवेक्षक एस. एस. मिरगावकर, कृषी सहाय्यक दादा गरंडे, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम गोलमडे, सरपंच समीक्षा गोंधळेकर, एक्सेल इंडस्ट्रीज लि. कंपनीचे एस. पाटणकर, शेंडे, निगुडकर, पाणलोट समिती अध्यक्ष सूर्यकांत गोलमडे, अनंत भागणे, विठ्ठल भागणे, सुरेश गोलमडे, जनार्दन भागणे, संतोष कांबळे, राजू कांबळे, प्रशांत कांबळे, सुभाष कांबळे व ग्रामस्थांनी सहभाग घेत गाव टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल केली. जलस्रोत ज्या डोंगरात आहे, त्या डोंगराच्या माथ्यावर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेततळ्याचे काम व सलग समतल चराची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळ्यात लाखो लीटर पाण्याचा साठा होऊन पाणी जमिनीत मुरल्याने झऱ्याला उन्हाळ्यात पाणी वाढणार असल्याचा विश्वास कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी व्यक्त केला. तसेच गावात सलग समतल चर, अनगड दगडी बांध इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बौध्दवाडी येथे ग्राम पाणी पुरवठा विभागामार्फत केलेल्या बोअरवेल कामामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. केतकी गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून पुढील वर्षी गाव टँकरमुक्त होईल, अशी आशा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. जलयुक्त शिवार अभियान राबवण्यासाठी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस. ए. सरतापे, तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार, मंडल कृषी अधिकारी ए. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.- दादा गरंडे, कृषी सहाय्यक - सुरेश मिरगावकर, कृषी पर्यवेक्षक
केतकी जलयुक्त होणार
By admin | Published: June 28, 2015 10:40 PM