खारेपाटण : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत खारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी नळपाणी पुरवठा योजना ही दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. परंतु अर्धवट स्थितीत असलेली ही नळयोजना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील तशीच आहे. त्याकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
यामुळे खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत हे स्वातंत्र्यदिनी कणकवली पंचायत समिती कार्यालयाच्यासमोर खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने उपोषण करणार आहेत. खारेपाटण सरपंच राऊत यांनी याबाबतचे लेखी निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, पोलीस निरीक्षक कणकवली यांना दिले असल्याचे सांगितले.याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत ह्यखारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी नळपाणी पुरवठा योजना करणेह्ण या नळयोजनेचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. या कामाचा मक्ता जिल्हा परिषद स्तरावरून बिपीन विनायक कोरगावकर या मक्तेदारास देण्यात आलेला होता. संबंधित मक्तेदाराने खारेपाटण नळयोजनेचे काम हे सद्यस्थितीत अर्धवट करून ठेवलेले आहे.
हे काम पूर्ण करण्याची मुदत संपून गेली असून, हे काम अर्धवट ठेवल्याने खारेपाटण गावाला याचा नळपाणी वितरण करताना मोठा फटका बसत आहे. सध्या खारेपाटण ग्रामपंचायतच्या जुन्या नळपाणी पुरवठा योजनेवर याचा ताण पडत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.नळपाणी ठेकेदाराच्या या अपूर्ण कामाला कंटाळून खारेपाटण ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आता सरपंच उपोषण करणार आहेत.