खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावांना वीजपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या अशा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या २२०/१३२ के.व्ही. वीजपुरवठा केंद्रात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान अचानक एका इन्स्टूमेंट (यांत्रिक अंमलबजावणी यंत्र)ला आग लागत धुराचे लोंड जमा झाल्याने एकच धावपळ उडाली. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग तातडीने आटोक्यात आणली गेली. तर सुरक्षेच्या कारणास्तव खारेपाटण सह कणकवली, देवगड राजापूर आदी भागातील गावांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता. दीड तासाच्या कालावधीनंतर वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्या काळात या भागातील नागरिक अंधारात होते.घटनेची माहिती मिळताच खारेपाटण येथील सहायक कनिष्ठ अभियंता किशोर मर्ढेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना सुरू होता. तसेच खारेपाटण येथील सार्वजनिक गणपती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या ढोल वादन स्पर्धेत देखील अचानक वीज गेल्याने व्यत्यय निर्माण झाला. मात्र पुन्हा वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विद्युतपुरवठा पुन्हा सुरू केल्याने स्पर्धा कार्यक्रम यशस्वी पार पडला.
कार्यकारी अभियंत्यांची तत्परताखारेपाटण येथील महापारेषण उपकेंद्र मधील ट्रान्सफॉर्मर फुटून पेट घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी तातडीने माहिती घेत राधानगरी फिडर लाईन वरून कणकवली शहरातील खंडित झालेला वीज पुरवत तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. तर इतर भागातील वीजपुरवठा तात्पुरता रत्नागिरी जिल्हा फिडर लाईन वरून घेऊन सुरू करण्यात आला.
वारंवार घटनांमुळे भीतीचे वातावरणखारेपाटण येथील वीज सबस्टेशन केंद्रात यापूर्वी देखील मोठी आग लागून यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळून राख झाला होता. यावेळची लागलेली आग जरी कमी असली तरी यामुळे भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा घटनेला विद्युत मंडळाला सामोरे जावे लागेल. तरी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून उपकेंद्रामध्ये अधून मधून ट्रान्सफॉर्मरला आग लागून पेट घेण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर वेळीच उपाय काढणे गरजेचे आहे.