चिपळूण : तालुक्यातील पाचांबे पुनर्वसन खेरशेत येथील प्रलंबित विकासकामांची पुनर्वसन अधिकाऱ्यांसह लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रलंबित विकासकामांचा अहवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिला जाणार आहे.पाचांबे पुनर्वसन खेरशेतमधील प्रलंबित विकासकामे पूर्णत्त्वास जावीत, याकरिता माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पासाठी पाचांबे येथील ग्रामस्थांचे खेरशेत येथे पुर्नवसन करण्यात आले. मात्र, खेरशेत येथे ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी गटारे, विहीर, सार्वजनिक शौचालये, वीज, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली. ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शासनाच्या निधीचा चुराडा झाला. तसेच येथील ग्रामस्थांकरिता पाच किलोमीटरवरून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतील पाईपलाईनला गळती लागत असल्याने पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिवाय प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. प्रकल्पग्रस्त या प्रलंबित विकासकामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी हा विषय माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेऊन संदीप सावंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलवली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. यानंतर माजी खासदार राणे यांनी प्रकल्पग्रस्तांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन नितीन राऊत, अव्वल कारकून नीलेश आंबेरकर, अशोक साळुंखे, लघुपाटबंधारे विभागाचे फर्नांडिस, आलंदकर, साळगावकर, सरफरे तसेच प्रकल्पग्रस्त शांताराम बल्लाळ, पंकज सावंत, जयराम निकम, विलास गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, विजय गायकवाड, उत्तम गायकवाड, संतोष सावंत, सुभाष बल्लाळ, सचिन जाधव, किशोर बल्लाळ, पांडुरंग जाधव, विठ्ठल जाधव, अमृत सावंत, मारुती बल्लाळ आदी उपस्थित होते. पुनर्वसन अधिकाऱ्यांनी कुचांबे कॉलनी ते येडगेवाडी - रिंगरोडची पाहणी केली. दि. २७ रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व आमदार सदानंद चव्हाण स्वत: पाहणी करणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात, याकडे येडगेवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)यावेळी शासकीय पथक प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची पाहणी करेल आणि याबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती पावले उचलली जातील, असे सांगितले. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करीत आमच्या समस्या न सुटल्यास नायशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यामध्ये अपूर्ण असलेली गटारे, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, स्मशानभूमीची दुरवस्था, विहीर, वीज, सार्वजनिक शौचालये आदी कामांची पाहणी केली. विहिरीचा उपसा करून पाणी पिण्यायोग्य केले जाईल. तसेच प्रलंबित विकासकामांचा अहवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना सादर केला जाईल, असे सांगितले.
पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून खेरशेतची पाहणी
By admin | Published: November 19, 2015 9:21 PM