कसई दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील घरात घुसून दोघांनी नंदकुमार कुबडे यांच्या तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांनी मुलीला हिसकावून घेत त्यापैकी एकाला पकडले. पळून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीला ग्रामस्थांच्या साहाय्याने पकडून दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. यामुळे दोडामार्ग बाजारपेठेत खळबळ उडाली. मुलीला उचलून नेणाऱ्या व्यक्तींची मन:स्थिती चांगली नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. रविवार असल्याने नंदकुमार कुबडे आपल्या घरात काम करीत होते. घरात त्यांचे आई-वडील व मुलगी होती. दुपारी साडेबारा वाजता सीतुदेव उद्घल आणि यल्लपा स्वामी जारंगावार (रा. चारपी, जि. निजामाबाद) हे दोघे कु बडे यांच्या घरात शिरले. त्यातील यल्लपा याने कुबडे यांच्या तीन वर्षांच्या बालिकेला उचलून घेतले. मात्र, ही बाब कुबडे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर नंदकुमार कुबडे धावत आले. त्यांनी मुलीला हिसकावून घेत यल्लपाला पकडले. या गडबडीत सीतुदेव पळून गेला. मात्र, जमलेल्या ग्रामस्थांनी त्यालाही ताब्यात घेऊन दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले.दोघेही तेलगू भाषेत बोलत असल्याने त्यांच्या ठेकेदाराला बोलावून घेतल्यानंतर सत्य बाहेर आले. यलप्पा हा मतिमंद असून, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तो घरात घुसला. मुलीला पळवून नेण्याचा त्याचा बेत नव्हता, असे ठेकेदाराने सांगितले. याला तेथीलच काका कुबडे यांनी सहमती दिली. त्यामुळे तक्रार करण्यात आली नाही. खबरदारी म्हणून दोन्ही व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली व सोडून देण्यात आले. यावेळी सरपंच संतोष नानचे, चेतन चव्हाण उपस्थित होेते. चेतन चव्हाण यांनी, या दोन्ही व्यक्तींची निजामाबाद येथील पोलीस ठाण्यात चौकशी करून नंतरच त्यांना सोडावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)
घरात घुसून बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न
By admin | Published: February 22, 2015 11:59 PM