सावंतवाडी : प्रेमाच्या बहाण्याने शिरूर (जि. पुणे) येथील अल्पवयीन मुलीचे औरंगाबाद येथून अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी औरंगाबाद पोलिसात केली आहे. मुलीचे अपहरण करणारा युवक शिरूर येथीलच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हे दोघेही सावंतवाडीत असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. शिरूर येथील मुलगी चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे औरंगाबाद येथे गेली होती. हीच संधी साधत शिरूर येथील मुलाने तिला औरंगाबाद येथून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी औरंगाबाद पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू केला. यामध्ये युवकांसह मुलगीही सावंतवाडीच्या दिशेने आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे औरंगाबादचे पोलीस शनिवारी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या युवकांचा शोध घेतला. मात्र त्यांना सापडू शकला नाही. त्यामुळे पोलीस माघारी परतले असून, या युवकाचे नावासह माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. याबाबत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना विचारले असता, पोलिसांनी आमच्याकडे नाव दिले नसून, त्यांचे मोबाईल लोकेशन सावंतवाडीत दाखवत असल्याने त्यांनी येथे येऊन तपास केल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचे अपहरण
By admin | Published: January 03, 2016 12:26 AM