राजापूर : गणेशमूर्तींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वडाचे भले मोठे झाड कोसळून क्लिनर ठार झाल्याची घटना रायपाटण टक्केवाडीत रविवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीमध्ये उपचार सुरू आहेत.रायपाटण टक्केवाडीत मागील पंधरा दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. रविवारी चिपळूणमधून गणपतीच्या सुमारे अडीचशे मूर्ती घेऊन ट्रक (एमएच०४/एल ९८८७) हा पाचलमधील गणेशमूर्तिकार गांगण बंधू यांच्याकडे निघाला होता. रात्री साडेदहाला तो ट्रक रायपाटण टक्केवाडीदरम्यान आला असताना तेथे बाजूला असलेले वडाचे झाड अचानक मोडले व ट्रकवर जाऊन कोसळले. संपूर्ण ट्रकच झाडाखाली सापडला. त्यावेळी ट्रकमधून दोघेजण प्रवास करीत होते. त्यापैकी अमित अनंत सावंत हा गाडी चालवीत होता, तर बाजूला क्लिनर मंदार नंदकुमार लकटे (२०) हा तरुण बसला होता. वडाचे झाड ट्रकवर पडताच मोठा आवाज आला. यामध्ये मंदार नंदकुमार लकटे हा वीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला होता. त्याच्या डोक्याच्या एका बाजूला जोरदार मार लागला होता तर चालक अमित अनंत सावंत हा गाडीत अडकून पडला होता. अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने टक्केवाडीतील आजूबाजूच्या लोकांनी त्या दिशेने धाव घेतली. अनेकांनी तत्काळ मदतीला सुरुवात केली. तोवर रायपाटण शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज गांगण, अशोक चांदे, राजू चव्हाण, सुधीर रोडे, संदीप कोलते, मंगेश पराडकर, सरपंच राजेश नलावडे, उमेश पराडकर, संतोष कारेकर यांचा समावेश होता. गाडीचा क्लिनर असणारा मंदार लकटे हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला प्रथम बाहेर काढण्यात आले.त्यानंतर ट्रकमध्ये अडकून पडलेला चालक अमित अनंत सावंत याला बाहेर काढण्यात आले. त्याच्या पायाला तसेच शरीराच्या विविध भागावर जखमा झाल्या होत्या व वेदनेने तो ओरडत होता. त्याची एकूणच गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्याला रत्नागिरीला उपचारासाठी हलविले. तर मृत मंदार लकटेचा मृतदेह रत्नागिरीला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. रविवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर रात्रीपासून ओणी-अणुस्कुरा मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद होती. एसटीची वाहतूक सकाळपासून ताम्हानेमार्गे वळविली होती. शिवाय वाटूळ, विलवडे, हरळ, परुळेमार्गे ही वाहतूक सुरु होती.
ट्रकवर वडाचे झाड कोसळून क्लिनर ठार ; चालक जखमी
By admin | Published: May 29, 2017 11:05 PM