सावंतवाडी: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची मते सहा लाखांच्या आसपास असल्याने उदयोजक किरण सामंत हे लोकसभा लढण्यास इच्छुक असतील तर त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची भावना मी फक्त बोलून दाखवली मात्र त्यांनी जो काहि दिवसापूर्वी मोबाईलवर मशालीचा स्टेटस ठेवला होता तो अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर असलेल्या नाराजीतून होता असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीतील कोणाला ही उमेदवारी मिळू दे आम्ही काहि करून सध्याचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव करणे हेच लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार राजन तेली,प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महेश सारंग,संजू परब,राजन म्हापसेकर,महेश धुरी,दादू कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले,2019 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पावणे चार लाख मते पडली होती. ही मते आणि आता आम्ही सर्वजण भाजपात आलो आहोत. त्यामुळे ही सर्व मते सहा लाखांच्या घरात जाणार आहेत त्यामुळे नक्कीच ही जागा भाजपला मिळावी या हेतूनेच आम्ही कार्यकर्त्याचा दबाव गट निर्माण करून वरिष्ठ नेत्यांकडून ही जागा भाजप ला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
तसेच उद्योजक किरण सामंत हे निवडणूक लढवणार असतील तर त्यानी भाजप मध्ये यावे आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी या माझ्या वक्तव्यावरून सामंत यांनी मशाली चा मोबाईल स्टेटस ठेवला नव्हता त्याचा राग अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर होता.त्यामुळे हा स्टेटस ठेवल्याचा दावा राणे यांनी केला आहे.तसेच महायुती मधून कोणीही निवडणूक लढवू दे आमचा सर्वाचा एकच लक्ष्य विनायक राऊत यांचा पराभव करणे असल्याची पुस्ती ही त्यांनी यावेळी जोडली.