कणकवली : कोल्हापूर येथील एका युवकाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल कलमठ येथील युवकाने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .
कलमठमधील युवकाकडून यापूर्वी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कामगारांना गांजा पुरवठा करण्यात येत असल्याची ही चर्चा सुरू आहे . त्यामुळे त्या युवकाकडे आलेले पिस्तुल हे ठेकेदार कंपनीच्या कामगारांमार्फत मध्यप्रदेश कनेक्शन मधून आले का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे .कोल्हापूरपोलिसांनी कणकवलीत येत कलमठ मधील त्या वीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. सध्या तो युवक कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे . त्या युवकाचे कलमठ कणकवली भागात या पूर्वीचे काही कारनामे ही उघड झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .
कलमठमधील त्या युवकाने कोल्हापूरमधील युवकाला पिस्तूल दिल्याचे पोलिसांकडे कबूल केल्याने कलमठमधील त्या युवकाने हे पिस्तूल आणले कुठून ? या हत्यार कनेक्शनचा नेमका संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे .
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्यार बाळगल्याप्रकरणी कोल्हापूर राधानगरी येथील सरवडेमधील एका युवकाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याच्यावर कारवाई सुरू आहे . सध्या तो तेथील पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत त्या आरोपीकडे तपास करत असताना त्याने बाळगलेले पिस्तूल कुठून आणले याच्या चौकशी दरम्यान या पिस्तुलचे कणकवली तालुक्यातील कलमठ कनेक्शन समोर आले . त्यानंतर कोल्हापूर पोलीस कणकवलीत दाखल झाले .त्यांनी आपल्यासोबत संशयित आरोपीला घेत कलमठमधील त्या युवकाचा शोध सुरू केला . कलमठ मधील तो युवक काही काळ कोल्हापूरमध्ये कामाला असल्याने आरोपी व युवकाची ओळख झाली होती . कणकवलीत या युवकाचा शोध घेत असताना पहिल्यांदा त्याच्या घराजवळ जाऊन चौकशी केली असता तो आपल्या आईसोबत कणकवलीत गेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आपला मोर्चा कणकवली शहरात वळवला .
कणकवली शहरात तहसीलदार कार्यालयाच्या मागे तो तरुण निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . त्याला कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आणत त्याची रवानगी कोल्हापूरला करण्यात आली . मात्र , अद्याप कलमठमधील त्या युवकावर गुन्हा दाखल झालेला नाही .
पण कणकवली शहरालगत असलेल्या भागात हत्यार कनेक्शन उघड झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . आता या प्रकरणात अजून कोणती नावे पुढे येतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे . तसेच ठेकेदार कंपनीच्या कामगारांचे यामागे काही कनेक्शन आहे का ? त्याचाही पोलिस तपास होण्याची गरज आहे .