सावंतवाडी : कोलगाव दलित वस्तीमध्ये नळयोजना नसल्याने तेथील लोकवस्तीला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच तेथील विहीरही कोरडी पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरीचे खोदकाम करून नळयोजना करण्यासाठी निधी आठ दिवसात उपलब्ध करून द्यावा. अन्यथा कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दलितवस्तीतील ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. कोलगाव दलितवस्तीत सुमारे शंभर लोकवस्ती आहे. ही वस्ती गावाच्या उंचभागी असून, ग्रामपंचायत नळयोजनेची पाईप लाईन आमच्या वस्तीपर्यंत आलेली नाही. नळयोजनेचे पाणी आमच्या वस्तीपर्यंत येत नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर आमच्या वस्तीपासून बऱ्याच अंतरावर खोल भागात आहे. आमची वस्ती उंचावर असल्याने या विहिरीचे पाणी आम्ही पिण्यापासून सर्व गोष्टींसाठी वापरतो. पण ही विहीर डिसेंबरपासून कोरडी असल्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागते. आम्ही मागासवर्गीय असल्याने गावातील इतर लोक आम्हाला आपल्या विहिरीचे पाणी भरायला देत नाहीत. त्यामुळे आमची पाण्याविना गैरसोय होते. याची कल्पना वेळोवेळी ग्रामपंचायतीला दिलेली आहे. पण ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीला आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय करणार? याबाबत जानेवारी २०१६ मध्ये विचारणा केली असता, राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करून तुम्हाला पाणी मिळेल, असे सांगितले. या गोष्टीला आज चार ते पाच महिने पूर्ण झालेले आहेत. सध्या पाण्याविना आमचे फार हाल होत आहेत. आम्ही नाईलाजाने हे निवेदन आपल्याला देत आहोत. आमच्या पाण्याची सोय येत्या आठ दिवसांत न केल्यास ३० मे रोजी कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तन्वी सोनू कदम, यशोदा बाबुराव कदम, सुगंधा सुरेश जाधव, मयुरी लाडू जाधव, रवींद्र लवू जाधव, लक्ष्मी लवू जाधव आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.सध्या कोलगाव दलितवस्तीचा पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत असून वस्तीतील ग्रामस्थ पाण्यासाठी दाही दिशा फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पिण्याची सोय न केल्यास येत्या आठ दिवसात उपोषणाचा इशारा संबंधीत ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)पालकमंत्र्यांनी दिलेला निधी परत दलित वस्तीत असलेल्या विहिरीची खोदाई करून त्या विहिरीवर नळयोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विनंती केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या फंडातून निधीही उपलब्ध करून दिला. पण कोलगाव ग्रामपंचायतीने कोलगाव दलितवस्ती ही शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सामाविष्ट असल्याने शासनाच्या दुसऱ्या निधीतून पिण्याच्या पाण्याचे काम करता येणार नाही, असे सांगून मंजूर केलेला निधी परत केला.
कोलगाव दलितवस्तीत पाणीटंचाई
By admin | Published: May 14, 2016 11:41 PM