टेंभ्ये : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यान्वित असणारे कोकण विभागीय शिक्षण मंडळ लवकरच स्वत:ची वेबसाईट सुरू करणार आहे. यामुळे कोकण बोर्ड आता एका क्लिकवर पाहता येणार आहे. विभागीय मंडळाच्या कामकाजाला गती यावी, यासाठी मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे विभागीय मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. डॉ. काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असल्याचे विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी सांगितले. सध्या सर्व शासकीय कामकाज आॅनलाईन पद्धतीने केले जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानेदेखील या गतिमान पद्धतीचा वापर केला आहे. यामुळेच इयत्ता दहावी व बारावीची आवेदनपत्र आॅनलाईन पद्धतीने भरली जातात. याचा पुढचा टप्पा म्हणून कोकण विभागीय शिक्षण मंडळाने स्वत:ची वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय मंडळाची सर्व परिपत्रके, शाळांचा पत्रव्यवहार, मंडळासंदर्भातील शासन निर्णय, मंडळाचे नाविन्यपूर्ण उपक्रम यासह मंडळासंदर्भातील अन्य सर्व बाबींची माहिती या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व माध्यमिक शाळांचा केवळ मंडळाच्या वापरासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी तयार केला जाणार आहे. मंडळाचा शाळेशी होणारा सर्व पत्रव्यवहार या ई-मेलच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे कागदाचा वापरदेखील कमी प्रमाणात होणार आहे. विभागीय मंडळाच्या स्वतंत्र वेबसाईटमुळे मंडळाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात गती येणार आहे. त्याचबरोबर माहितीची गळती थांबवण्यास मदत होणार आहे. आॅनलाईन माध्यमातून पत्रव्यवहार झाल्याने टपाल खर्च वाचवण्यात मंडळाला यश मिळणार आहे. या उपक्रमाची माहिती देताना गिरी व सहाय्यक सचिव सी. एस. गावडे उपस्थित होते. (वार्ताहर) कोकण मंडळ अद्ययावत करणार गुणवत्तेत राज्यात अग्रेसर असणारे कोकण विभागीय शिक्षण मंडळ अधिक अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मंडळाची स्वतंत्र वेबसाईट हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही वेबसाईट विभागातील सर्व शाळांसाठी खुली करण्यात येईल, असे डॉ. काळे यांनी सांगितले. या वेबसाईटमुळे मंडळाची माहिती तत्काळ मिळण्यास मदत होईल. तसेच मंडळाच्या कामकाजाचीदेखील माहिती मिळणे सोपे जाणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग : कोकणातील गुणवत्ता पुढे आली कोल्हापूर बोर्डाशी जोडल्या गेलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोकण विभागीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामुळे कोकणातील गुणवत्ता खऱ्या अर्थाने पुढे आली आहे. कोकणातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वाढता आलेख सर्वांच्या नजरेसमोर आला आहे. पेपरलेस कामकाज कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कारभारात गती यावी, कोकण बोर्डाचा कारभार पारदर्शक राहण्यासाठी वेबसाईट महत्त्वाची ठरणार आहे. तसेच पेपरलेस काम करताना मंडळाचा शाळेशी होणारा सर्व पत्रव्यहार ई - मेलच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे.
कोकण बोर्ड एका क्लिकवर
By admin | Published: February 02, 2016 11:29 PM