रत्नागिरी : माझं बालपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखं आणि चारचौघांसारखं गेलं. त्यात उठून दिसावं असं वेगळपण नव्हतं. पण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर नाव कमावण्यासाठी कोकणच्याच मातीने आपणास घडविले, असे प्रतिपादन विनोद अभिनेते अंशूमन विचारे यांनी केले.न्यू इंग्लिश स्कूल नेवरे व माँसाहेब मिनाताई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोप सोहळ्यास अभिनेते अंशुमन विचारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाबरोबरच अंशुमन विचारे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलाखत चंदू कांबळे यांनी घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आपले गाव असून, आई-वडील गावीच असतात. व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढल्यानंतर बालपणाची आठवण कधीतरीच होते. पण बालपण कधी संपले हे मात्र आठवत नाही. परंतु मुलांनी बालपण जपलं पाहिजे. कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त असणाऱ्या या बालपणाच्या आणि दंगामस्ती असावी, अकाली मोठेपणा मुलांनी स्वीकारु नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.चित्रपटाच्या शुटींगनिमित्ताने महाराष्ट्रभर फिरावे लागते. परंतु, कोकणी माणसावर आपलं प्रेम आणि आपणावर झालेल्या कोकणी संस्कारात बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. अभिनयाच्या क्षेत्रात कोकणातील मुलांनी उतरावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगून, त्यासाठी आवश्यक ते काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी विचारे यांनी त्यांच्या फु बाई फु, खाऊ गल्ली या मालीकांचा उल्लेख करत काही किस्से सादर केले. बोबड्या बोलीतील त्यांनी सादर केलेल्या गीताने प्रेक्षकांमध्ये जल्लोष निर्माण झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. मोरे, उपाध्यक्ष शरद कापसे, सहसचिव संदिप कुळ्ये, संचालक एम. डी. मोरे, उदय आरेकर, अनिकेत हर्षे, मुकूंद परांजपे, माजी मुख्याध्यापक वाय. डी. कुंभार उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभिनेते अंशुमन विचारे प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहिल्याबरोबर प्रेक्षकांमधून शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. विनंती करुनही शिट्ट्या थांबेनात, त्यावेळी शिट्ट्या थांबवा अन्यथा मीही शिट्टी वाजवेन, असे सांगून अंशुमन यांनी जोरदार शिट्टी घातल्यानंतरच प्रेक्षकांच्या शिट्ट्या थांबल्या.
पडद्यावर नाव कमावण्यासाठी कोकणनेच घडवल
By admin | Published: January 18, 2015 10:50 PM