रत्नागिरी : दिवा स्थानकाजवळील दातिवली रेल्वेस्थानकात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक खोळंबली. यामुळे अनेक गाड्या उशिरा धावत होत्या. याचा फटका रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सुटीचा हंगाम असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यातच गाड्या उशिरा धावत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या दातिवली रेल्वेस्थानकावर दादर-करमळी ही मध्यरात्री येणारी गाडी पहाट झाली तरी आली नसल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे मार्गावर आंदोलन केले. यामुळे रेल्वे प्रशासनाने मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद केली. अखेर रत्नागिरी व इतर रेल्वेस्थानकावर सकाळी रत्नागिरी-दादर गाडीसाठी आलेले प्रवासी ताटकळत होते. या आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने ३ ते ४ तास गाड्या उशिरा धावत आहेत. राजधानी एक्स्प्रेस, नेत्रावती, कोकणकन्या, राज्यराणी आणि पॅसेंजर या गाड्यांचे वेळापत्रकच बदलून गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. (शहर वार्ताहर)
प्रवाशांच्या आंदोलनामुळे कोकण रेल्वे विस्कळीत
By admin | Published: May 29, 2016 12:23 AM