कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणच्या भूमीला भेट देणारे पर्यटक आणि त्याचबरोबर आपल्या मूळ गावी येणारे मुंबईकर कोकण रेल्वेला अधिक पसंती देत असतात. मुंबईतून कोकण, गोवा आणि दक्षिणेकडच्या राज्यांकडे जाण्यासाठी कोकण रेल्वे हा सुलभ मार्ग आहे. या मार्गावरून २६ जानेवारी १९९८ ला कोकण रेल्वे प्रथम धावली. त्यावेळेस केवळ ६६ स्थानके होती. आता नव्या २१ स्थानकांची भर पडल्याने ही संख्या ७८ वर पोहोचणार आहे.रोहा ते वेरणा आणि वेरणा ते ठोकूरपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने होत आहे. नव्या स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलंबानी, कडवई, वेरावल्ली, खारेपाटण, आचिर्णे या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांची संख्या वाढल्याने रेल्वे गाड्यांचा विलंब आता टाळता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल.पावसाळी वेळापत्रक बदलून आता १ नोव्हेंबर पासून आता नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्या वेळापत्रकानुसार गोवा तसेच सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. मात्र, मुंबईहुन परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल होणार नाही.नवीन वेळापत्रकाप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या कणकवली स्थानकातील वेळा पुढील प्रमाणे आहेत .मंगला एक्स्प्रेस पहाटे ५.४२ वाजता , दिवा पॅसेंजर सकाळी ९.२१ वाजता , मांडवी एक्स्प्रेस दुपारी ११.३३ वाजता , जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळी ४.२८ वाजता , तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ७.४४ वाजता , कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री ९.०८, मेंगलोर एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता , डबलडेकर (मंगळवार, गुरूवार) सकाळी ८.१० वाजता , ओखा एक्स्प्रेस (गुरुवार, शनिवार) दुपारी १.३८ वाजता , पुणे एक्स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार) सायंकाळी ७.१० वाजता , वातानुकूलीत करमळी एक्स्प्रेस (गुरुवारी) दुपारी ३.२० वाजता , तिरूनवेली दादर एक्स्प्रेस (गुरुवार) सकाळी ६.२८ वाजता , बिकानेर एक्स्प्रेस (रविवार) सकाळी ६.२९ वाजता , डबलडेकर (दर रविवारी) दुपारी ३ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होईल.कोकणकन्या ही सावंतवाडी स्थानकात मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी ७.३६ वाजता कुडाळ येथे रात्री ८.९ वाजता , सिंधुदुर्गनगरी ८.२८वाजता तर वैभववाडी येथे ९.३८वाजता पोहचेल. तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी ६.५० वाजता सुटून कुडाळला ७.१०वाजता, सिंधुदुर्गनगरी ७.३० वाजता पोहचेल. मांडवी एक्सप्रेस ही सावंतवाडीला १०.४० वाजता , कुडाळला ११.०२ वाजता पोहचेल. नेत्रावती एक्स्प्रेस ही कुडाळला सकाळी ६.५० वाजता तर तेजस एक्स्प्रेस कुडाळला ३.२८ वाजता येणार आहे.पावसाळी हंगामात सुरक्षिततेचा उपाय म्हणून गाड्यांचा वेग कमी करण्याबरोबरच गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येतो. त्यामुळे काहीसा विलंब गाडयाना होत असतो. आता पावसाळा संपत आल्याने वेळापत्रक बदलण्यात आले आहे.१० जून पर्यंत लागू राहणार वेळापत्रक !कोकण रेल्वे मार्गावरील नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर ते १० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवास करावा . असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांकडून करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा आता वेग वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 2:22 PM
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा आता वेग वाढणार !१ नोव्हेंबर पासून नवीन वेळापत्रक ; प्रवाशाना दिलासा