रत्नागिरी : जगाला तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधने बहाल करून नेहमीच सेवेचा दर्जा उंचावणाऱ्या कोकण रेल्वेलाही आता भारतीय रेल्वेच्या बरोबरीने उच्च तंत्रज्ञान अंगिकारण्याचे वेध लागले आहेत. जगातील सर्वात प्रगत असे वेगाचे हायटेक तंत्रज्ञान वापरून देशातील रेल्वेचा वेग ताशी ६०० किलोमीटर करण्याचा चंग रेल्वेने बांधला आहे. त्यामुळे येत्या काही काळात अतिवेगवान रेल्वेच्या चाचण्या होऊन भारतीय रेल्वेबरोबरच कोकण रेल्वेही हायटेक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१ आॅगस्ट २०१६ रोजी रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात रेल्वेने सुरू केलेल्या रेल्वे अभियांत्रिकी संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अतिवेगवान रेल्वेची संकल्पना मांडली व त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली. सध्या नवी दिल्ली ते मुंबई दरम्यान स्पॅनिश कंपनीच्या टॅल्गो या प्रतितास १४० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेची चाचणी सुरू आहे. लवकरच टॅल्गोची चाचणी कोकण रेल्वे मार्गावरही होणार आहे. एकीकडे भारतीय रेल्वेत वेगाचे गणित सुधारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता चक्क ५५० ते ६०० किलोमीटर प्रतितास वेगाच्या रेल्वेचे तंत्रज्ञान जगात विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेत, कोकण रेल्वेतही आणावे, यासाठी जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीच असे तंत्रज्ञान पुरविणाऱ्या मायग्रोव्ह कंपनीच्या प्रतिनिधींना नवी दिल्लीत चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. अतिवेगवान तंत्रज्ञान भारतीय रेल्वेत कसे आणता येईल, त्यासाठी काय बदल करावे लागतील, याबाबतची चर्चा या कंपनीबरोबर होणार आहे.केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाचा सुरेश प्रभू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावरील स्थानकांची संख्या वाढली, विविध सुविधा वाढल्या आहेत, नवीन मार्गांना मंजुरी मिळाली आहे, त्याबाबतचे करारही झाले आहेत. भारतीय रेल्वेतही अनेक सुधारणा, सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानात प्रगतीकडे झेपावणाऱ्या भारतीय रेल्वेला वेगातही हायटेक करण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षांच्या काळात भारतीय रेल्वे, कोकण रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे वेगातही होणार हायटेक!
By admin | Published: September 15, 2016 1:05 AM