रत्नागिरी : कोकण रेल्वे व्यवस्थापनाची सध्याची वाटचाल पाहता, रत्नागिरी रेल्वे स्थानक येत्या काही कालावधीतच अस्वच्छतेचे केंद्र बनणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. या स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर २ लगतचा ‘ब्लास्टलेस अॅप्रन ट्रॅक’ हा ‘ब्लास्ट ट्रॅक’ (खडीयुक्त मार्ग) बनविण्याचा घाट कोकण रेल्वे व्यवस्थापनाने घातला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये - जा करणाऱ्या गाड्यांमधून रेल्वे ट्रॅकवर जमा होणाऱ्या घाणीची स्वच्छता करणे अशक्य होणार आहे. ट्रॅकवर घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रवासी व स्थानकावर काम करणाऱ्या सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. रत्नागिरी हे आशिया खंडातील नंबर एकचे रेल्वेस्थानक बनवावे, असे महामंडळाचे पहिले व्यवस्थापकीय संचालक इ. श्रीधरन यांचे स्वप्न होते. त्यानंतर रत्नागिरीत कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय बनविण्याचाही प्रस्ताव होता. परंतु, नंतर मात्र या सर्वच बाबतीत रत्नागिरीला डावलले गेले. आता रेल्वेचे व्यवस्थापनच रत्नागिरी स्थानकाला दुर्गंधीच्या खाईत लोटण्यास सज्ज झाले असल्याचे, समोर येत आहे.गेल्या वर्षभराच्या काळात रत्नागिरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ लगतच्या धोकादायक बनलेल्या ट्रॅकवरून गोव्याकडून मुंबईला जाणाऱ्या गाड्या धावत आहेत. स्थानकावरील या ट्रॅकवर रेल्वे येताच ट्रॅकची स्थिती वेडीवाकडी होत असून, अपघाताची भीती आहे. सिमेंट बेसवर स्लीपर्स टाकून हा स्थानकावरील ट्रॅक उभारण्यात आला आहे. ट्रॅकवर स्वच्छता ठेवता यावी, म्हणून सिमेंट बेस अर्थात ‘ब्लास्टलेस अप्रन’ ठेवण्यात येतात. रत्नागिरीत स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच गाड्या थांबतात. त्यामुळे रेल्वेच्या आतील प्रसाधनगृहातील मलविसर्जन थेट ट्रॅकवर गोळा होते. सिमेंटबेस ट्रॅक असेल, तर ही घाण पाण्याने स्वच्छ करता येते. यामुळेच दोन महिन्यापूर्वीच या सिमेंट बेसचे दुरुस्ती काम करण्यासाठी रेल्वेने ठेका दिला होता. या कामावर लाखो रुपये खर्च होऊनही, दुरुस्ती योग्यरित्या झाली नाही. त्यानंतर संबंधित ठेकेदार गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ब्लास्टलेस ट्रॅकचे काम कमी खर्चात होण्याची शक्यता असतानाही, व्यवस्थापनाने आता या ट्रॅकचे काम सिमेंट बेस न करता ब्लास्ट अर्थात खडीवर स्लीपर्स टाकून करण्याचा ठेका दिला आहे. लवकरच हा ट्रॅक उखडला जाणार असून, या २ नंबर ट्रॅकवरील वाहतूक तीन नंबरवरून केली जाणार आहे. त्यासाठी दुप्पट खर्च येणार असल्याची चर्चा रेल्वेच्याच वर्तुळात सुरू असून, या अधिकाऱ्यांना आवरणार कोण, असा सवाल केला जात आहे. याबाबत कोकणातीलच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी लक्ष घालावे व कोकण रेल्वेचे अधिक खर्चामुळे होणारे नुकसान वाचवावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गप्पा तंत्रज्ञानाच्या, काम बेसलेस?मूळातच कोकण रेल्वेमार्गावर, रत्नागिरी स्थानकावर तीन व मडगाव स्थानकावर एक असे चार ट्रॅक ब्लास्टलेस आहेत. त्यामुळे या ट्रॅकची साफसफाई करणे शक्य होते. भारतीय रेल्वेच्या मार्गावरील विविध स्थानकांवर मिळून असे ८ हजार ब्लास्टलेस अप्रन (सिमेंट बेसवर स्लीपर्स व ट्रॅक असलेले) असूनही त्यांची डागडुजी योग्यरित्या होते. कोकण रेल्वेमार्गावरील दोनच स्थानकांवर एकूण ४ ब्लास्टलेस अॅप्रन असतानाही, त्याची देखभाल कोकण रेल्वेला जमत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे तंत्रज्ञानात पुढे असल्याचे सांगितले जात असताना, ही कृती ‘बेसलेस’ असल्याचा आरोप होत आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाला येणार ‘बुरे दिन’?
By admin | Published: January 18, 2015 11:19 PM