रत्नागिरी : कोकण परिमंडलात वीज चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हूक अथवा आकडा टाकून चोरी करण्याबरोबर अनधिकृत वीज कनेक्शन तसेच मीटरमध्ये हेराफेरी करण्यात येत आहे. कोकण परिमंडलात वीजचोरीचे एकूण ३४१ प्रकार उघडकीस आले असून, वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांकडून ६८ लाख ७९ हजार १४५ रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.कोकण परिमंडलात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आकडा टाकण्याचा एकमेव प्रकार उघडकीस आला असून, संबंधित ग्राहकाकडून २५०० रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत वीज कनेक्शनचे २४ प्रकार निदर्शनास आले असून, ग्राहकांकडून ५ लाख ८४ हजार ८०८ इतकी रक्कम वसूल करण्यात येणार आहे. कोकणात प्रथमच एवढ्या प्रमाणात वीजचोरी उघड झाली असल्याने खळबळ उडाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अवघे दोन प्रकार घडले असून, ३४ हजार ७९० रुपयांची वसूली केली जाणार आहे. आकडा टाकणे, अनधिकृत कनेक्शनच्या तुलनेत मीटरमध्ये हेराफेरीचे प्रकार सर्वाधिक सापडले आहेत. दोन्ही जिल्ह्यात ३१४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. संबंधित ग्राहकांकडून ६२ लाख ७२ हजार ९७ रुपयांची दंडात्मक वसुली केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३११ प्रकारणे निदर्शनास आली असून, ग्राहकांकडून ६२ लाख २३ हजार ७ इतकी रक्कम वसूल केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३ प्रकार निदर्शनास आले आहेत. ४९ हजार ९ इतक्या रकमेची वसुली केली जाणार आहे. कोकण परिमंडलातील वीज चोरीमध्ये सर्वाधिक चोरी रत्नागिरी जिल्ह्यात आढळली आहे. पैकी रत्नागिरी विभागात ७०, चिपळूण विभागात ८७, तर खेड विभागात १७८ वीजचोऱ्या सापडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड विभागात चोरीचे सर्वाधिक प्रकार निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)
कोकण परिमंडलात ३४१ वीजचोऱ्या उघड
By admin | Published: February 10, 2016 11:02 PM