रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९३.२९ टक्के इतका लागला आहे. सलग पाचव्या वर्षी बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल २.३९ टक्क्यांनी कमी असला, तरीही कोकण बोर्ड राज्यात प्रथम आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहाव्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा विक्रम केला आहे.कोकण मंडळाचे विभागीय सचिव व प्रभारी अध्यक्ष आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये निकालाबाबतची माहिती दिली. परीक्षेत कोणताही गैरप्रकार न घडलेले हे एकमेव मंडळ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी सहसचिव सी. एस. गावडे उपस्थित होते.राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ८८.१० टक्के, तर औरंगाबाद मंडळाचा ८७.८० टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वाधिक कमी निकाल नाशिक मंडळाचा असून, ८३.९९ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ३२ हजार २८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३० हजार ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १६ हजार ८०३ मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी १५ हजार २७५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५१ टक्के इतके आहे. १५ हजार ४८० मुलींपैकी १४ हजार ८४१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.८७ टक्के आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ६५१ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ९५८ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९१.८० टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार ६३२ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्गचा एकूण निकाल ९५.९३ टक्के इतका लागला आहे.निकाल प्रक्रिया पूर्ण करण्यात कोकण आघाडीवर आहे. केवळ तांत्रिक बाबीमुळे एका अपंग विद्यार्थ्याचा निकाल राखीव असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल. अन्यथा सर्वांचे निकाल जाहीर करण्यात आल्याचे मंडळाचे विभागिय सचिव आर. बी. गिरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) सर्वाधिक निकाल वाणिज्य विभागाचाकोकण विभागात सर्वाधिक निकाल वाणिज्य विभागाचा लागला आहे. वाणिज्य शाखेचे ९६.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ एमसीव्हीसी विभागाचा निकाल ९४.७९ टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेचा ९३.८१, तर सर्वांत कमी निकाल कला शाखेचा (८७.६८) आहे.टक्का घसरला, तरीही अव्वलमागील चार वर्षांच्या तुलनेत कोकण विभागाचा बारावीचा निकाल यावर्षी घटला आहे. २०१२ मध्ये ८५.८८ टक्के, २०१३ मध्ये ९४.८५ टक्के, तर २०१४ मध्ये ९५.६ टक्के, २०१५ मध्ये ९५.६८ टक्के इतका निकाल लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत २.३९ टक्क्यांनी निकाल कमी असला, तरी राज्यात प्रथम आहे. विभागात २१४ कनिष्ठ महाविद्यालये असून, २१ परीरक्षक केंद्रे, तर ५३ परीक्षा केंदे्र आहेत. तीन जूनला विद्यार्थांना गुणपत्रक उपलब्ध होणार आहेत.सिंधुदुर्गचाच वरचष्मायाहीवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालात आपला झेंडा सर्वांत वर नेला आहे. कोकण विभागीय मंडळ स्थापन झाल्यापासून सलग पाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मंडळाप्रमाणे राज्यातही अव्वल येत आहे. त्याहीआधी कोल्हापूर विभागीय मंडळात असताना सिंधुदुर्गने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. सलग सहा वर्षे सिंधुदुर्गने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.
कोकण राज्यात पुन्हा अव्वल
By admin | Published: May 25, 2016 10:46 PM