सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाचा असणारा कुणकेरी गावातील हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. तत्पूर्वी सकाळी श्री देवी भावईच्या घरी श्रींची ओटी भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम भक्तांंच्या अलोट उत्साहात पार पडले. कोकणातील शिमगोत्सव हा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी या गावात शिमग्याच्या सातव्या दिवशी हुडोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज बुधवारी प्रथेप्रमाणे कुणकेरी येथील हुडोत्सव साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांनी या प्रसिद्ध धार्मिक हुडोत्सवाला उत्साहाने गर्दी केली होती. बहिणीच्या या उत्सवाला येण्यासाठी श्री देव क्षेत्रपालेश्वर व श्रीदेव कलेश्वर या दोन्ही भावांना हुडा उत्सवासाठी वाजतगाजत आणण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर अवसार प्रसाद कौल देऊन पालखी व रोंबाटासह हुड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी, वाघाची शिकार हा आगळावेगळा कार्यक्रम पाहण्यास असंख्य भाविकांनी गर्दी केली. तर तिन्ही संचारी अवसार १०० फूट उंच असलेल्या हुड्यावर चढले व भाविकांकडून दगड मारण्याचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. (वार्ताहर)
कुणकेरीचा हुडोत्सव साजरा
By admin | Published: March 29, 2016 10:28 PM