शिरगांव : पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील कुवळे गावचे पोलीस पाटील उदय सहदेव कदम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.कुवळे गावचे पोलीस पाटील उदय कदम यांच्याविरुद्ध पदाचा गैरवापर करून लोकांना खोटे धनादेश देणे, खोटे व्यवहार करणे, गावचे तलाठी यांच्या अनुपस्थितीत खोटे शिक्के व सही करणे, सात-बाराचे खोटे उतारे देणे अशी तक्रार ग्रुप ग्रामपंचायत कुवळे-रेंबवलीचे सरपंच यांनी केली होती.तहसीलदार व पोलीस निरीक्षक देवगड यांच्याकडून या अर्जावर चौकशी व झालेल्या जबाबात पोलीस पाटील उदय कदम यांनी पदाचा गैरवापर करून गावातील लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.तहसीलदार देवगड तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी ०१/०७/२०१९ रोजी चौकशी व कागदपत्रांसह प्रांताधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार पोलीस पाटील कुवळे यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारी या दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाच्या ठरू शकतील असे सखोलदर्शनी स्पष्टपणे दिसत आहे, असे प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.१६ फेब्रुवारी २०१९ रोजी कुवळे ग्रामपंचायतीने घेतलेल्या खास ग्रामसभेच्या ठरावात पोलीस पाटील यांनी तक्रारदार यांचे पैसे एक महिन्याच्या आत परत करेन असा मजकूर नमूद केला आहे. तसेच पोलीस पाटील उदय कदम यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर खोटा धनादेश दिला व फसवणूक केल्याचा गुन्हा कबूल करून स्वत:ची सही केली आहे.ग्रामसभेने संबंधित पोलीस पाटील यांना पदावरून हटविण्यात यावे अशी लेखी मागणी केली होती.या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा कणकवली उपविभागीय दंडाधिकारी वैशाली राजमाने यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अधिनियमातील खंड ९ (फ) मधील तरतुदीनुसार कुवळे गावचे पोलीस पाटील उदय कदम यांना कुवळे पोलीस पाटील पदावरून बडतर्फ केले आहे.
पदाचा गैरवापर : कुवळेचे पोलीस पाटील उदय कदम बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:27 PM
पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील कुवळे गावचे पोलीस पाटील उदय सहदेव कदम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देकुवळेचे पोलीस पाटील उदय कदम बडतर्फप्रांताधिकाऱ्यांचे आदेश : पदाचा केला गैरवापर