मालवण (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून मागील चोवीस तासांत सरासरी १०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. देवगड तालुक्यात तब्बल १८८ मिलीमीटर असा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे आता पडझडीच्या घटना समोर येत आहेत. कुंभारमाठ चिपी विमानतळाकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावरील हॉटेल गारवा नजीकच्या धोकादायक वळणावरील दरड पहिल्याच पावसात कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाअभावी हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला असून आता नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. उशिरा दाखल झालेल्या पावसाने आता हळूहळू सरासरीकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात आता सरासरी ७३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.पावसाने चिपीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या धोकादायक वळणावर सातत्याने असे प्रकार घडत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मे महिन्यात याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पहिल्याच पावसात दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याठिकाणी अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुंभारमाठ–चिपी सागरी महामार्गावर दरड कोसळली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 05, 2023 12:29 PM