वैभववाडी(सिंधुदुर्ग): कुर्ली येथे पाळलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या वृद्ध पवार दांम्पत्यावर बिबट्याने घरात घुसुन हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार(६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.कुर्ली येथे मोहन पवार कुटुंबिय शुक्रवारी(ता.२०) रात्री जेवण आटोपून झोपले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाळीव कुत्रा भुकायला लागला. त्यामुळे मोहन पवार यांची पत्नी मनिषा यांनी कुत्रा का भुंकतो? म्हणून पाहीले तेव्हा घराच्या पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते.
कुत्र्याला सोडविण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्याने कुत्र्याला सोडून मनिषा पवार यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी मोहन पवार पुढे गेले असता बिबट्याने त्यांना लक्ष केले. परंतु त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान या हल्ल्यात मोहन पवार त्यांच्या पाठीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरात घुसून बिबट्याने पवार दांपत्यावर हल्ला केल्यामुळे कुर्ली गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तालुक्याच्या सर्वच भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून भक्ष्याच्या शोधात त्यांचा दिवसाढवळ्या मनुष्यवस्तीत वावर दिसू लागला आहे. कुर्लीतील थरारामुळे जनतेत भिती पसरली आहे.