दोडामार्ग : गेल्या पंधरा दिवसांपासून केर, मोर्ले परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींनी आता पाळये गावात आपले बस्तान मांडले आहे. येथील केरळीयन शेतकरी हुगीस यांच्या केळी बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. वनविभागाचे कर्मचारी हत्तींना हुसकावून लावण्यासाठी पाळये गावात गस्तीवर असले तरी हत्ती दर दिवशी वेगवेगळ्या गावात जाऊन नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून केर, मोर्ले परिसरात जंगली हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. दिवसाढवळ्या फिरणाºया या हत्तींनी लोकवस्तीपर्यंत मजल मारली आहे. दर दिवशी लाखो रुपयांचे नुकसान हत्तींच्या कळपाकडून सुरू आहे. सध्या या कळपाने केर, मोर्लेच्या सीमेवर असलेल्या पाळये गावात बस्तान मांडले आहे.
येथील केरळीयन शेतकरी हुगीस यांच्या केळी बागायतीत प्रवेश करून हत्तीने केळी बागायतीचे मोठे नुकसान केले. वनविभागाचे कर्मचारी या परिसरात गस्तीवर पाठविण्यात आले आहेत. मात्र, नुकसानसत्र सुरूच असल्याने हत्ती हटाव मोहीम राबविण्यापेक्षा हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.