आचरा : चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.याची माहिती मिळताच कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी लब्देवाडी, तेरई ग्रामस्थ उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.चिंदर तेरई माळरानावरील शशिकांत गोलतकर यांची ३०० कलम असलेली बाग आग लागून त्यांची मोहरलेली आंबा कलमे जळून नुकसान झाले होते ही आग रविवारी लागली होती.ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत आग विझविली होती. संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन या भागातील दुसरे काजू बागायतदार विलास घागरे आदींनी आपल्या बागेतील गवत साफसफाई सुरू केली होती.यासाठी होंडा कंपनीचे दोन गवत कापणी यंत्रे आणून सोमवार सकाळपासून कामाला सुरुवात केली होती.दुपारी विलास घागरे कामगारांसह जेवायला गेले असतानाच बागेच्या बाहेरच्या बाजूने अकस्मात आग लागली त्यात त्यांची ४०० काजूकलमे जळाली व गवत कापणी २ यंत्रे ही जळून गेली.वाऱ्यामुळे फैलावलेली आग लगतच्या चिंदर सरपंच भाग्यश्री घागरे यांच्या बागेत घुसल्याने त्यांच्या ही तीन एकर क्षेत्रावरील ४०० मोहरलेली काजू कलमे जळून त्यांचेही मोठं नुकसान झालं. त्याच माळावरील तुकाराम पाटणकर यांची २०० आंबा कलमे, प्रभाकर चिंदरकर यांची २०० आंबकलमे जाळून गेली. आगीची माहिती मिळताच तेरई,लब्देवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी मालवण येथून नगरपालिकेचा अग्निशामक बंबही बोलविला होता पण माळरानावर घनदाट झाडी मुळे बंबाने आग विझविणे शक्य होणार नसल्याने ग्रामस्थांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते.या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे सुनिल कदम, ग्रामविकास अधिकारी पि.जी.कदम, ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे, पोलीस पाटील दिनेश पाताडे, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच भाग्यश्री घागरे, धनंजय नाटेकर,गणपत घागरे,उत्तम घागरे, निलकंठ चिंदरकर आदी उपस्थित होते.