रत्नागिरी : हाऊसिंग सोसायटी स्थापन न करता जमीन विक्री करून पाचजणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंडणगड येथे उघड झाला. याप्रकरणी अर्जुन श्रीधर भोसले (रा. साईनगर, ता. मंडणगड) याच्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाचजणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.अर्जुन श्रीधर भोसले याने दुय्यम निबंधक, मंडणगड येथे १९ मार्च २०१४च्या एन. ए. नुसार हौसिंग सोसायटी उभारून फ्लॅट विक्रीची परवानगी घेतली होती; परंतु अर्जुन भोसले याने बिगरशेती परवानगीचा आदेश व बनावट रेखांकन नकाशे याचा बेकायदेशीर वापर करून इमारत न बांधताच जागा परस्पर विकली. त्यामध्ये वाल्मीकी दगडू परहर (वय ४५, संजीवनी हॉस्पिटल, मंडणगड) यांनी पाच लाख ३० हजार रुपये देऊन जागा घेतली होती.त्यानंतर याठिकाणी २०१४ ते ७ मार्च २०१७ या कालावधीत अनेकांनी त्याठिकाणी जागा घेतल्या होत्या; परंतु ज्यावेळी वाल्मीकी परहर हे जागेचा सातबारा आपल्या नावावर करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता ही जागा हौसिंग सोसायटीसाठी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठघण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन भोसले याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पन्हाळे करीत आहेत. (वार्ताहर)
मंडणगडात जमीन घोटाळा; लाखो रुपयांची फसवणूक
By admin | Published: March 09, 2017 11:08 PM