सिंधुदुर्गनगरी : महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेत ज्यांच्या मालमत्ता जाणार आहेत, त्यांना सप्टेंबरपर्यंत मोबदला देऊन त्यानंतरच या महामार्गातील संपादित जमीन महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी गुरुवारी दिली.भूसंपादन प्रक्रियेत ज्यांच्या जमिनी व मालमत्ता जात आहेत, त्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल, या संदर्भात कणकवली व कुडाळ प्रांताधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून, या बैठकीचा अहवाल कोकण आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्याचप्रमाणे केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी महामार्ग चौपदरीकरणात जमिनी जाणाऱ्यांना मोबदला कसा व किती द्यावा, याचा निर्णय घेण्याचे अधिकार कोकण आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार मोबदला देण्याबाबत विचारविनिमय करून जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत कणकवली व कुडाळ प्रांताधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक येत्या दोन दिवसांत आयोजित केली जाईल. त्याबाबतचा अहवाल कोकण आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर मोबदला कसा व किती द्यायचा, यावर कोकण आयुक्त निर्णय घेणार आहेत. त्यानंतर मोबदल्याबाबत निश्चित सांगता येणार आहे. (प्रतिनिधी)१५ जुलैपर्यंत अहवाल तयार करणारमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची जमीन मोजणी प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करून १५ जुलैपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे, तर आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संबंधितांकडून हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधितांना मोबदला देऊन सप्टेंबरमध्ये संपादित जमीन महामार्ग, रस्ते विकास प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली.मोबदला देताना जमीन, घरे, झाडे याबाबतची भरपाई एकत्रित करून जास्तीत जास्त भरपाई संबंधित शेतकऱ्यांना दिली जाईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती ई. रवींद्रन यांनी दिली.
मोबदल्यानंतरच जमीन हस्तांतरण
By admin | Published: June 04, 2015 11:34 PM