फुणगूस : गेली दोन वर्षे कोंड्ये (लावगणवाडी) पुलाचा प्रश्न गांभीर्याने न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत कोंड्ये ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसात पुलाचे काम सुरु न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.कोंड्ये (लावगणवाडी) पुलासंदर्भात बांधकाम विभागाकडे अनेकवेळा संपर्क साधण्यात आला. मात्र, निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. पुलाच्या रखडलेल्या बांधकामाला येत्या आठ दिवसात सुरुवात न झाल्यास दि. २२ फेब्रुवारी रोजी डिंगणी फुणगूस पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपसरपंच दीपक प्रकाश शिंदे यांनी दिला आहे.जाकादेवी - फुणगूस मुख्य रस्त्यापासून कोंड्ये - देऊळवाडी, गुरववाडी, लावगणवाडी या तीन वाड्यांसाठी जोडण्यात येणाऱ्या लावगणवाडी रस्त्यावरील वहाळावर पूल नसल्याने येथील लोकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यापासून वाड्या जवळ आहेत. मात्र, पूल नसल्याने पावसाळ्यात रुग्ण, शालेय विद्यार्थ्यांना जंगलातून वळसा मारावा लागत आहे. येथील रस्त्यावर पूल व्हावा ही लोकांची सततची मागणी होती. अखेर या मागणीला यश आले.नाबार्ड १७ योजनेंतर्गत २१,५४,८५० रुपये पुलासाठी मंजूर झाल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी भूमिपूजन झाल्यानंतर ठेकेदारानेही कामाला सुरुवात केली. त्यामुळे रानावनातून करावा लागणारा वनवास लवकरच संपुष्टात येईल, या आशेने येथील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, सुरुवातीपासूनच पुलाच्या कामाची कूर्मगती, विभागाचे दुर्लक्ष हा सारा खेळ सुरु असतानाच ठेकेदार हे पुलाचे काम अर्धवट सोडून निघून गेला आहे.शासनाने ठेकेदाराला बांधकाम पूर्ण करण्यास दोन वर्षांचा दिलेला कालावधी उलटून गेला. तरीही संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, या पुलाचे काम मार्गी लागावे म्हणून येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरुख कार्यालयाचे उंबरठे झिजवले, निवेदनही दिले. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संपूर्ण कोंड्ये गावचे ग्रामस्थ एकवटले आहेत. येत्या आठ दिवसात याची दखल न घेतल्यास थेट बांधकाम विभागाच्या विरोधात डिंगणी - फुणगूस पुलावर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक
By admin | Published: February 03, 2015 10:44 PM