दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी येथे भूस्खलन होऊन रस्त्यावर दरड कोसळली. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने मांगेलीची वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नागरिकांची तसेच शाळकरी विद्यार्थांची गैरसोय झाली. या दुर्घटनेला पाच तास उलटले तरी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी पोहचले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर दुपारनंतर बांधकाम विभागाने दरड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गाव निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसले आहे. याठिकाणच्या चारही वाड्या एकमेकांपासून विखुरलेल्या आहेत. गावात जाण्यासाठी डोंगर पोखरून रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मांगेलीच्या डोंगरात भूस्खलन होत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. फणसवाडीत तर लोकवस्तीच्या माथावर डोंगराला उभी भेग गेली आहे. त्यामुळे इथले रहिवासी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. बुधवारी पहाटे अशीच एक दरड रस्त्यावर आली. कुसगेवाडी येथील रस्त्यावर ही दरड कोसळली. त्यामुळे मांगेलीची वाहतूक ठप्प झाली. परिणामी रात्री देउळवाडित गेलेली एस.टी. बस गावातच अडकून पडली. शाळेत जाणारे विद्यार्थी व कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गावकऱ्यांची गैरसोय झाली. दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने गावाचा तालुक्याची संपर्क तुटला. घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे व इतर पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जेसीबी पाठवले. युद्धपातळीवर काम करून एक तासानंतर माती बाजूला केली व रस्ता मोकळा केला. अखेर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपाययोजना करणे आवश्यक याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेत रस्त्यावरून वाहतुक नसल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्याच्या वरील बाजूसही डोंगराचा काही भाग खचल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापनाने यासंबंधी योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
Sindhudurg: मांगेलीत दरड कोसळली, दुपारनंतर वाहतूक पूर्ववत सुरु
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 31, 2024 4:25 PM