शिरोडा : मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळताच समुद्रातील मासेमारी हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाळ्याची चाहूल लागल्याने शिरोडा भागात बोटी विसावण्यास सुरुवात झाली आहे. आपापल्या बोटी सुरक्षितस्थळी लावण्यासाठी शिरोडा, रेडी, केरवाडा, आरवली, टांक, मोचेमाड या भागातील मच्छिमारांची लगबग पहायला मिळत आहे. पावसाळा जवळ येताच किनारपट्टीवरील मच्छीमार समुद्रात तयार होणाऱ्या बदलांचा, समुद्रात येणाऱ्या उधाणाचा अंदाज घेऊन आपल्या मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्याच्या तयारीला लागतात. यासाठी समुद्रकिनाऱ्यापासून जवळच सुरक्षित ठिकाणी लाकडीबार, झावळ्या आदीपासून एक बंदिस्त गोडावून तयार केले जाते. लाकडी आेंडके व जाडजूड दोरीच्या सहाय्याने मच्छीमार बोटी किनाऱ्यावरील या सुरक्षित स्थळी आणून ठेवतात. बोटी किनाऱ्यावर आणण्यासाठी प्रचंड वेळ, मेहनत व मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. यामध्ये बोटींचे नुकसान होण्याची भीती असते. काही ठिकाणी वेळेची बचत, कमी मनुष्यबळ आणि अपघातापासून बचाव या घटकांचा विचार करून मच्छीमार क्रेनचा वापर करून बोटी किनाऱ्याबाहेर काढतात. या बोटी किनाऱ्यावरील शाकारणी केलेल्या गोडाऊनमध्ये आणल्यानंतर त्यावर प्लास्टिक टाकून पावसापासून संरक्षण केले जाते. त्यानंतर पावसाच्या कालावधीत बोटींची देखभाल, मासेमारी जाळ्यांची दुरुस्ती, इंजीनची दुरुस्ती अशी कामे केली जातात. मान्सून सुरू झाल्यानंतर १५ जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद असते. या काळात समुद्रातील माशांचे प्रजनन उत्तमरित्या व्हावे आणि त्यातून मत्स्य उत्पादन वाढावे, हा देखील मासेमारी बंदीचा प्रमुख उद्देश असतो. (प्रतिनिधी)नौका किनाऱ्यावरशिरोडा, वेळागर, रेडी, आरवली, टांक, मोचेमाड याठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावरील सुमारे ८० टक्के लोक मासेमारी व्यवसायाशी निगडीत असून, मासेमारी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. पुढील तीन महिने मच्छीमारी नौका किनाऱ्यावर विसावणार आहेत.
मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात
By admin | Published: June 08, 2015 12:02 AM