मालवण : मालवण आगाराला उपलब्ध करून देण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेसचा शुभारंभ बुधवारी दिमाखात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी आमदार नाईक यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पर्यटक व स्थानिक प्रवाशांनी वातानुकूलित व आरामदायी शिवशाही बसमधून सुखकर प्रवास करावा, असे आवाहनही नाईक यांनी केले.
मालवण-पुणे-निगडी मार्गावरील नियमित ४.१३ वाजता सुटणाऱ्या हिरकणी बसच्या जागी शिवशाही बस बुधवारपासून सुरू झाली. मालवण-पुणे या जिल्ह्यातील पहिल्या शिवशाही बसफेरीचा श्रीगणेशा करण्याचा मान मालवण आगाराला मिळाला.शुभारंभप्रसंगी विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक गौतमी कुबडे, आगार व्यवस्थापक संतोष बोगरे, विभागीय लेखाधिकारी जीवन कांबळे, उपयंत्र अभियंता ए. एस. मांगलेकर, वाहतूक निरीक्षक अमोल कामते, स्थानकप्रमुख सचेतन बोवलेकर, उदय खरात, अशोक निव्हेकर, अमित शंकरदास, सतीश वाळके, विनोद शंकरदास, प्रसाद बांदेकर, प्रसाद करंदीकर, जयसिंग कुबल यांच्यासह व्यापारी संघाचे प्रमोद ओरसकर, नितीन वाळके, सुहास ओरसकर, रवी तळाशीलकर, परशुराम पाटकर, भाजपा तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर, पंकज साधये, बाबी जोगी, सेजल परब, दीपा शिंदे, दीपक मयेकर, तपस्वी मयेकर, महेंद्र महाडगुत तसेच प्रवासी उपस्थित होते.शिवशाही एसटी बस पुणे-निगडीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर आमदार वैभव नाईक व विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी प्रवासी तसेच मालवणातील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
यावेळी नितीन वाळके यांनी पर्यटनाचा विचार करता मालवण-कसाल, मालवण-आचरा तसेच मालवण-कुडाळ मार्गावर कायमस्वरूपी शटल बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी सूचना मांडली. यावेळी विभाग नियंत्रक हसबनीस यांना तिन्ही मार्गावर शटल बस सेवा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.पत्रकार नंदकिशोर महाजन यांनी रात्रीच्या वेळी बाजारपेठेतून पूर्वी जात असलेल्या मालवण-रत्नागिरी व मालवण-कोल्हापूर या बसफेऱ्या पुन्हा बाजारपेठेतून पूर्ववत करण्यात याव्यात, अशी सूचना मांडल्यानंतर एसटी अधिकाऱ्यांनी तत्काळ आगर व्यवस्थापकांना बुधवारपासून बाजारपेठेतून बसफेरी मार्गस्थ करण्याचे आदेश दिले.शिवशाहीच्या वेळेत बदल करण्याची मागणीमालवण आगारातून ४.१५ वाजता पुणे येथे जाणारी बस पहाटे २ वाजता पोहोचते. शिवशाही बस जलद व आरामदायी असल्याने ती पुण्याला आणखीन लवकर पोहोचणार आहे. यात प्रवाशांना पहाटे पाच वाजेपर्यंत ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे साडेचार वाजता सुटणाऱ्या शिवशाही बसचा वेळ बदलून सायंकाळी ७ वाजता ती मार्गस्थ करण्याचे नियोजन केल्यास प्रवाशांना ते फायदेशीर ठरेल, अशा सूचना मांडण्यात आल्या.उशिराने मार्गस्थ करण्याबाबत विचार केला जाईल, असे एसटी प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी शिवशाही बस प्रवाशांना सुखकर असली तरी सवलती मिळत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी काय करावे? त्यामुळे मालवणातून सुरू असलेली हिरकणी बस (एशियाड) बंद करू नये, जेणेकरून तिचा प्रवाशांना फायदा होईल, अशी मागणी केली.