कणकवली: कणकवली शहरालगत गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एकजण घटनास्थळावरून पसार झाला. तर दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली.वैभव सीताराम पांगम (वय-२५), स्वप्नील सुरेश कुडतरकर (३०) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तर, रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली ) हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयंडे, गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई पहाटेच्या सुमारास केली. या कारवाईच्यावेळी १ किलो ३१० ग्रॅम असा एकूण ३९ हजार रुपयांचा गांजा, एक दुचाकी, दोन मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख ७०० रुपये जप्त करण्यात आले.पुढील तपास कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात करीत आहेत.
कणकवलीत एलसीबीच्या पथकाची धाड; गांजा विक्रेत्या दोघांना घेतले ताब्यात; एकजण पसार
By सुधीर राणे | Published: June 28, 2023 11:47 AM