सावंतवाडी : काँग्रेस नेतृत्वाकडून एकाच नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात येत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे भविष्यात काँगे्रस पक्षाने अशी चूक करू नये, अशी विनंती जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली. नाणार येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित सभेसाठी मोहन प्रकाश तसेच अशोेक चव्हाण आले होते. त्यावेळी जिल्हा काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राजू मसुरकर, जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परूळेकर, बाळा गावडे, तालुकाध्यक्ष रवींद्र्र म्हापसेकर, महेंद्र सावंत, उल्हास मणचेकर, इर्शाद शेख, जगन्नाथ डोंगरे, सोमनाथ टोमके, सतीश बागवे, सुधीर मल्हार, विभावरी सुकी, सुमेधा सावंत, विलास कोरगावकर, सुगंधा साटम, बाळा बोंद्रे, भाई जेठे, बाळा जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या जिल्ह्यात पक्षवाढीसाठी लागणारी ताकद देण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाने पक्षीय बांधणीकरिता कामाला लागा, असे सांगितले. जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष बांधणीकरिता भरपूर मेहनत घ्यावी लागणार असून लवकरच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊ.- राजू मसुरकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस