वेंगुर्ले : नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून प्लास्टिकमुक्त, हागणदारीमुक्त व १०० टक्के कचरा संकलित करून चार प्रकारांत त्याचे वर्गीकरण करणारे वेंगुर्ले शहर महाराष्ट्रात प्रथम ठरले आहे. त्यामध्ये सातत्य राहण्यासाठी व नागरिकांमध्ये वारंवार जाणीवजागृती राहण्यासाठी कोकरेंच्या पुढाकारातून तालुक्यातील प्रशासन दर गुरुवारी ७ ते ९ या वेळेत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी १० रोजी कॅम्प भागात झाला.२ आॅक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाल्यानंतर सर्व कार्यालयांत आठवड्यातील दोन तास श्रमदानातून स्वच्छता करण्याची शपथ घेण्यात आली.मात्र, त्यामध्ये सातत्य राहिले नाही. याच मोहिमेचा आधार घेऊन मुख्याधिकारी कोकरे यांनी तहसीलदार जगदीश कातकर यांच्याशी स्वच्छता अभियानासंदर्भात चर्चा केली व आठवड्यातील दर गुरुवारी दोन तास तालुक्यातील प्रशासनाच्यावतीने स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभियानाचा प्रारंभ तहसील कार्यालय ते वडखोल कॅम्प रस्ता येथे करण्यात आला. यामध्ये तहसीलदार कातकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे तसेच पंचायत समिती, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग, विद्युत मंडळ, नगरपरिषद, आदी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.यापुढे दर गुरुवारी शहरातील एक भाग ठरवून स्वच्छ केला जाईल. प्रशासनाच्या या उप्रकमाबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. वेंगुर्ले शहराचा स्वच्छता पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वास मुख्याधिकारी कोकरे यांनी व्यक्त केला. आदर्शवत कारभारनगर परिषदेचे मुख्याधिकारी कोकरे यांनी मुख्याधिकारी पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ-सुंदर शहर, प्लास्टिक मुक्ती अशी अभियाने राबविली. त्यामुळेच वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले असून, आता देशातही प्रथम येण्यासाठी सज्ज झाले आहे.
सातत्यपूर्ण स्वच्छतेसाठी मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार
By admin | Published: December 13, 2015 11:01 PM