सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पानाची पिचकारी मारणाऱ्या एका व्यक्तीला ही पिचकारी चांगलीच अंगलट आली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी त्याला ५00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नंदू तळकटकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे.सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १६६ चे उल्लंघन ११७ प्रमाणे मनाई आहे. त्याची नोटीस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली असते. तशी नोटीस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लावण्यात आलेली आहे. तरीही ओरोस बुद्रुक येथील नंदू शांताराम तळकटकर यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३० वाजताच्या सुमारास याचे उल्लंघन करून पानाची पिचकारी मारली. तळकटकर हे कामानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. यावेळी ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर पानाची पिचकारी मारत असताना अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची गाडी समोर आली. त्यामुळे तुषार पाटील यांनी ते पाहिले. परिणामी पाटील यांनी पानाची पिचकारी मारणाºया व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले.त्यामुळे याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल पी. एल. सारंग यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली. त्याला पोलीस नाईक व्ही. डी. कोयंडे व पोलीस शिपाई के. एम. पावसकर साक्षीदार आहेत. पानाची पिचकारी मारून नियमभंग करणाºया तळकटकर यांना मुख्य न्याय दंडाधिकारी फडतरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
पानाची पिचकारी पडली ५०० रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:20 AM