वैभववाडी: ज्या पक्षाने राजकीय पुनर्वसन केले. त्याच पक्षावर खासदार नारायण राणे टीका करीत आहेत. भाजपची ध्येय धोरणे मान्य नव्हती. तर पक्षाचा 'एबी' फॉर्म भरून खासदारकी का स्वीकारलीत? असा सवाल करीत जर टीकाच करायची असेल तर अगोदर भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान भाजपाचे अतुल रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले आहे.वैभववाडीत सोमवारी झालेल्या स्वाभिमान पक्षाच्या जाहीर सभेत राणे यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. त्याअनुषंगाने रावराणे यांनी पत्रकार परिषदेत टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांच्या सोबत बंडू मुंडल्ये, शहराध्यक्ष रणजित तावडे, भाजप युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष बोडके, महेश गोखले, राजेंद्र रावराणे आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले, स्वाभिमानच्या सभेत आमच्या पक्षाचे खासदार राणे यांनी 'अच्छे दिन, महागाई', या मुद्द्यांवरून भाजपावर टीका केली. परंतु ज्यावेळी तुम्ही भाजपाची खासदारकी स्वीकारली त्यावेळी तुम्हाला हे मुद्दे माहीत नव्हते का, असा प्रश्न रावराणे यांनी उपस्थित केला. भाजपा पक्षाची किंवा सरकारची धोरणे पटत नसतील तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि नंतर भाजपावर टीका करा, असे त्यांनी सांगितले.रावराणे म्हणाले, 'पंचवीस वर्षे जिल्ह्याची सर्व सत्ताकेंद्रे राणेंच्या ताब्यात होती. तुम्ही विकास केला असा सतत दावा करता; तर मग मुलगा जिंकतो आणि तुमचा पराभव कसा होतो; हे कसे काय? इतरांचे प्रवेश घेण्याआधी स्वतःच्या आमदार पुत्राला स्वाभिमानमध्ये घ्या. त्यांना अजून काँग्रेसमध्ये का ठेवलात? असा मिश्किल प्रश्न करून जिल्ह्याचा खरा विकास युती सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्ग चौपदरीकरणासह हजारों कोटींची विकासकामे जिल्ह्यात सुरू आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तुमच्यामुळे झाले म्हणून भाषणात वारंवार सांगता. मग चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आपणही तेथे उपस्थित होतात. मग हे त्याचवेळी आपण जाहीर का केले नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांचे श्रेयही आमदार नितेश राणेच घेत असल्याची टीका त्यांनी केली.स्वतःचे बघा; जठारांची चिंता नकोमाजी खासदार निलेश राणे यांनी जठार यांना 'पुन्हा एकदा तरी निवडून येऊन दाखवा' या दिलेल्या आव्हानावर अतुल रावराणे म्हणाले की, जो पक्ष दुस-या पक्षाच्या माणसाला खासदारकी देऊन पुनर्वसन करू शकतो. त्या पक्षाला आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचे पुनर्वसन कठीण आहे का? प्रमोद जठार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि 'जेएनपीटी'चे विश्वस्तही आहेत. त्यांची चिंता निलेश राणेंनी अजिबात करू नये. त्यासाठी आमचा पक्ष आणि पक्षश्रेष्ठी सक्षम आहेत. त्यामुळे जठार यांना कोणत्या निवडणुकीत कुठल्या मतदारसंघात उतरवायचे आणि कसे निवडून आणायचे हे आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. तुम्ही स्वतःचे बघा; जठार यांची चिंता करू नका, असा सल्ला रावराणेंनी दिला.
खासदारकी सोडा; मग भाजपावर टीका करा, नारायण राणेंना भाजपाच्या अतुल रावराणेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:12 PM