सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोचिवली -चंदीगड, एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो, एनार्कुलम- हजरात निजामुद्दीन, मडगाव-चंदीगड, गोवा संपर्क क्रांती, कोचुवली-अमृतसर, एर्नाकुलम-अजमेर, तिरुनवल्ली-गांधी धाम, तिरुनवल्ली-जामनगर, हिस्सार, कोचुवल्ली-इंदूर, कोचुवल्ली-पोरबंदर आणि तिरुनवल्ली या बारा लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. या गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे किमान दोन थांबे द्यावेत तसेच मंगला एक्सप्रेस व सीएसटी-मंगलोर या गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय हवाई वाहतूक व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत, सचिव सतीश पाटणकर, खजिनदार विनोद रेडकर, उपाध्यक्ष भाई देऊलकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, अशोक सावंत आदी उपस्थित होते.दादर-सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस दादरवरून रात्री ९ वाजता सोडण्यात यावी. गरीब रथ ही गाडी जाता-येता पाच तास अगोदर किंवा उशिरा सोडण्यात यावी, कोकण रेल्वे मार्गावर डहाणू-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, आणि वांद्र्रा-सावंतवाडी अशा कोकणातील प्रवाशांसाठी गाड्या सोडण्यात याव्यात, तसेच गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी, ख्रिस्तमस आणि एप्रिल-मे या सुटीच्या काळात दर तीन तासांनी मुंबईवरून गाड्या सोडण्यात याव्यात, मत्स्यगंधा आणि नेत्रावती गाड्या मडगावनंतर प्रत्येक स्थानकावर थांबतात. यासाठी या दोन गाड्यांना सावंतवाडीत आणखी एक थांबा देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री प्रभू यांनी दिले.दरम्यान, सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आपण याबाबत लक्ष घालून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार राऊत व पालकमंत्री केसरकर यांनी दिले.
टर्मिनसचे काम मार्गी लावा!सावंतवाडी-टर्मिनसचे काम अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी रेल्वे गाडीत पाणी भरण्याची सोय नाही. केंद्र्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने बांदा- इन्सुली येथून बारमाही वाहणाऱ्या तेरेखोल नदीतून राज्य शासनाच्या मदतीने पाणी उपलब्ध करून घ्यावे किंवा तिलारी प्रकल्पाचे पाणी टर्मिनससाठी उपलब्ध करून घ्यावे, अशीही मागणी या निमित्ताने करण्यात आली.