दोडामार्ग : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तिराळी धरणाचा गोवा आणि महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारा कालवा खानयाळे येथे फुटला. यामुळे येळपई नदीत ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली. परिणामी तिराळी-दोडामार्ग दोन तासांहूनही अधिक काळ बंद राहिला. तिराळी धरण हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.
या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. मात्र, तरीही निद्रिस्त असलेल्या तिलारी विभागाला जाग येत नव्हती. यामुळे अखेर खानयाळे येथे कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटला. परिणामी तेथील माती व पाणी लोकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारा हा कालवा बंद होत असल्यामुळे शेती करपण्याची भीतीही शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत आण याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. एढेच नाही, तर प्रशासनाबरोबरच येथील आमदार, पालकमंत्री यांचेही याकडे लक्ष नाही. यामुळे या कालव्यांची योग्य दुरुस्ती आणि देखभाल होत नाही. यासंदर्भात आता, जोवर कालव्याचे पूर्ण ऑडिट होऊन त्याची संपूर्ण दुरुस्त होत नाही, तोवर यातून पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी या घटनेची माहिती घेतली असून यासंदर्भात चौकशी होणार असल्याचे विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी म्हटले आहे. याशिवाय, तिराळी विभागाची कार्यालये तिराळीत आणावीत यासाठीही येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे समजते.