रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण व रत्नागिरी या शहर व परिसरात तसेच अन्य काही भागातही बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या पाशात कर्जदारांची तडफड सुरू आहे. चक्रवाढ व्याज लावून वसुलीचा तगादा लावणाऱ्या विनापरवाना सावकारांच्याविरोधात आता त्रस्त कर्जदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या चार महिन्यात विनापरवाना सावकारी कर्ज देणाऱ्या तथाकथित सावकारांवर संंबंधित ८ कर्जदारांनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे विनापरवाना सावकारी कर्जाचा प्रश्न आता पिळवणुकीमुळे चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या २४ आहे. त्यात चिपळूण व रत्नागिरीतील परवानाधारक सावकारांची संख्या अधिक आहे. मात्र, ज्या तक्रारी झाल्या आहेत त्या अधिक व्याजदर आणि चक्रवाढ व्याज आकारून वसुलीचा तगादा लावणाऱ्या जिल्ह्यातील विनापरवाना सावकारांबाबत आहेत. जिल्ह्यात केवळ २४ परवानाधारक सावकार असल्याने अन्य विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असे आवाहन जिल्हा सहकार निबंधक कार्यलयाकडूनही करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही अशा विनापरवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या छळवणुकीबाबत खात्याकडे कोणाच्याही तक्रारी येत नसल्याने अशा बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होत नाही, अशी हतबलताही या विभागाकडून व्यक्त होत आहे.रत्नागिरी शहर व चिपळूण शहरात जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यापेक्षा या दोन्ही शहरात विनापरवाना सावकारी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अधिक व्याजदराने व त्यावर चक्रवाढ व्याज आकारल्याने कर्जदार डबघाईस आल्याने आवाज उठवला जात आहेत. (प्रतिनिधी)त्रस्त कर्जदारांकडून गुन्हे दाखलरत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत काही त्रस्त कर्जदारांनी काळात धाडस दाखवत विनापरवाना सावकारांविरोधात पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, अशा विनापरवाना सावकारांविरोधात दखलपात्र गुन्हे दाखल होण्याऐवजी केवळ अदखलपात्र गुन्हे दाखल करून विषय संपविण्यात येत असल्याची कुजबूज सुरू झाली. त्यातूनच गेल्या चार महिन्यात असे ८ अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्याचे पुढे आले. याबाबत कामकाज तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या कोकण विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या कानावर हा विषय नेण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात शहरातीलच साळवी स्टॉप येथील विनापरवाना सावकारी करणाऱ्या प्रशांत राजाराम साळुंखे यांच्याविरोधात हनीफ अब्दुल रेहमान वागळे (रा. कोकणनर) यानी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुंबई सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावकारी पाशात कर्जदारांची तडफड
By admin | Published: December 12, 2014 10:35 PM