राजापूर : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारींमुळे बिबट्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाल्याने त्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११३ जनावरे मृत्युमूखी पडली आहेत. झालेल्या नुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत सुमारे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणांनी मृत्युमुखी पडल्याने त्यांची संख्या घटली आहे. भौगोलिक विस्ताराने मोठा असणारा राजापूर तालुका हा जंगलमय म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये बारसू, भू, कोतापूर, तळगाव, केळवली, ओणी, सौंदळ, ताम्हाणे, काजिर्डा, येरडव आदी परिसरात सातत्याने बिबटे आढळून आले आहेत. अलिकडच्या काळात सुरु असलेली वृक्षतोड व रात्रीच्या वेळी हौसेखातर होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्या यामुळे भक्ष्य शोधताना अडचण येत असल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळविला. त्यामुळे जंगली भागातच आढळणारे हे बिबटे मागील काही वर्षात भरवस्तीत आढळू लागल्याने प्रचंड घबराटीचे वातावरण कायम राहिले आहे.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी हल्ला करुन त्यांना ठार कल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील पाच वर्षात तालुक्यात ११३ पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडल्याची घटना घडली आहे. शिवाय या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यानुसार ११३ जनावरांच्या मालकांना गेल्या पाच वर्षात ३ लाख २१ हजार पाचशे एवढे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यामध्ये सन २०१० - २०११ या आर्थिक वर्षात बिबट्यानी आठ जनावरे मारली होती. त्यापोटी त्या शेतकऱ्यांना २२ हजार ६५० रुपये भरपाई पोटी मिळाले होते. सन २०११ - २०१२ मध्ये १८ मृत जनावरांच्या मालकांना ५१ हजार ७५० , सन २०१२ - २०१३मध्ये २१ मृत जनावरांच्या मालकांना ६३ हजार आठशे रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर सन २०१३ - २०१४ मध्ये बिबट्याने जोरदार दहशत माजवत तालुक्यातील ३८ जनावरांना फस्त केले होते. त्यावेळी नुकसान भरपाईपोटी १ लाख ३९ हजार ७०० रुपयांची आर्थिक भरपाई संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली. चालू वर्षात म्हणजेच सन २०१४ - २०१५ मध्ये एकूण २८ जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, संबधित मालकांना २६ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.याबाबत वनविभागाने तत्काळ दखल घेऊन वेळीच पंचनामे सादर केल्यामुळे मालकांना वेळेवर आर्थिक मदत मिळाली आहे. मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्यानी चांगलीच जरब बसवली असून, त्याच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण कायम आहे. मागील पाच वर्षामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडलेल्या तसेच शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले आहे. दुसरीकडे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणाने मृत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (प्रतिनिधी)बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली जनावरे व प्राप्त नुकसानभरपाईनुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई.मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्याची जरब.हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढतोय.फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी केला हल्ला.बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढले.
बिबट्यांकडून पाच वर्षात तब्बल ११३ जनावरांवर झाला हल्ला
By admin | Published: April 15, 2015 11:34 PM