ओटवणे : हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर ओटवणे दशक्रोशीत पहिल्यापासून आहे. पण हे प्राणी थेट घरानजीक येऊन गुरांवर, मानवी वस्तीवर हल्ले करू लागल्याने भीतीचे सावट ग्रामस्थांवर पसरले आहे. बिबट्या तसेच पट्टेरी वाघाने दिवसाढवळ्या मंगळवारी असनिये येथील दुचाकीधारकांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच नांगरतास-सरमळे येथे गुरूवारी रात्री गाईवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ओटवणे दशक्रोशीतील ग्रामस्थांना जीव मुठीत धरूनच वस्तीत रहावे लागत आहे. याबाबत वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दशक्र ोशीतील बिबट्याचा वावर कायमच आहे. पण वनविभागामार्फत याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. असनिये येथील सतीश सुधाकर सावंत या मोटारसायकल चालवित असलेल्या युवकावर पहाटे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यापूर्वी नांगरतास-सरमळे येथील अंकुश कृृष्णा महाले या शेतकऱ्याचा बैल तसेच कोनशी येथील शेतकऱ्याचा बैल व शेळ्यामेंढ्या यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. काही काळ या भागात पट्टेरी वाघ आहे की नाही, याबाबत साशंकता होती. पण दाभिल येथील वस्तीच्या भागात पंजाच्या खुणा तसेच प्रत्यक्षदर्शीनी वाघ पाहिल्यानंतर वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले. या वाघामुळे बरेच प्राणी दगावल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सरमळे, नांगरतास, भालावल, सातोळी, बावळाट, दाभिल, विलवडे, कोनशी, तांबोळी, असनिये, घारपी ही गावे तशी डोंगरपट्ट्यात जंगलमय भागात येत असल्याने पहिल्यापासून येथे हिंस्त्र प्राणी राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शिवाय या प्राण्यांचे वारंवार येथे दर्शनही झाले आहेच पण त्याचबरोबर अनेक जंगली प्राण्यांची शिकार या हिंस्त्र प्राण्यांनी केली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी पाहिले आहे. पण भक्ष्याच्या शोधात आता हे प्राणी लोकवस्तीची वाट धरू लागले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोकवस्ती कमी आणि विरळ घरे या भागात असल्याने हे प्राणी न घाबरता घर-वस्तीवर चाल करून येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे डोंगरपट्ट्यांचे होणारे आधुनिकीकरण आणि बेसुमार वृक्षतोड. परप्रांतीयांच्या हातातच हे डोंगर, जंगलभाग गेल्याने प्राण्यांकडे, लोकवस्तीकडे येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि सद्यपरिस्थितीत तरी येथील लोक दहशतीत वावरत असून, यावर काही उपाययोजना अंमलात आणण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. वनविभागानेही याची दखल घेऊन याबाबत तत्काळ कृती आमलात आणण्याची गरज आहे.गेल्या काही वर्षांपासून वाघाकडून तसेच हिंस्र व इतर प्राण्यांकडून गुरांवर तसेच माणसांवर हल्ले केले जात आहेत. पण हे सत्र आता खूपच वाढत चालले असल्याने कुणाचा तरी जीव गेल्यानंतर शासनाला जाग येणार काय? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. प्रशासनाकडून अशी जर टाळाटाळ होत असेल तर नाईलाजास्तव ग्रामस्थांना कायदा हाती घ्यावा लागेल, अशा संतप्त प्रतिक्रियाही येथे उमटत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा बिबट्या मनुष्य वस्तीत येऊन हल्ले करण्याचा धोका आहे. वनविभागाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)परप्रांतियांच्या कारनाम्याचे प्रकारदशक्रोशीत वाढत जाणारा परप्रांतीय केरळीयनांचा वावरच याला मूळ कारण असून या परप्रांतीयांकडून शेती-बागायतीच्या नावाखाली डोंगरपट्ट्यातील जनावरांना इलेक्ट्रिक शॉक, इजा पोहोचविणारी हत्यारे वापरून घाबरविले जात आहे. त्यामुळे प्राणी केरळीयनांनी उजाड केलेल्या डोंगरपट्ट्यात न थांबता वस्तीकडे आक्रमण करतात. त्यामुळे या केरळीयन परप्रांतीयांचा त्वरित बंदोबस्त करावा. नंतर या हिंस्र जनावरांचा हल्ला कमी होईल.- दीपक गावडे,घारपी, शिवसेना उपशाखाप्रमुख
बिबट्याचा दुचाकीधारकांसह गाईवर हल्ला
By admin | Published: November 20, 2015 9:10 PM