कणकवली: सतत दोन दिवस रात्री हवेलीनगर, फोंडाघाट मध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने गंभीर नोंद घेतली असली तरी, हलगर्जीपणा न करता बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.फोंडाघाट, हवेलीनगर येथे दुचाकीस्वाराच्या समोर उजेडात बिबट्याने उडी मारली. तसेच काही वेळातच तो बिबट्या दिसेनासा झाला. ही बाब रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या ठेकेदार गुरव यांना त्यांनी सांगितली. गुरव यांनी त्यांच्या घरी लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, त्यांच्या मागील बाजूस बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने वन विभागाचे वनपाल कोळेकर व वनरक्षक पाटील यांना त्याबद्दल माहिती दिली. मात्र, वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्या पसार झाला होता. याबाबत माहिती घेतली असता, बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत निपाणी- देवगड रोडला जोडणाऱ्या कोंड्ये रस्त्या दरम्यान काही दिवसापूर्वी सापडले होते. त्याचे वनविभागाने शव विच्छेदन करून विल्हेवाट लावली, अशी कुजबूज होती. त्यामुळे बछड्याच्या शोधात तो बिबट्या फिरत तर नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा कोंडये, हवेलीनगर सीमेवर सायंकाळी एका खडकावर बसलेला बिबट्या एका वाटसरूला दिसला. त्यामुळे त्या परिसरात त्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.मॉर्निंग वाकला जाणाऱ्या ग्रामस्थांना अथवा रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्याना धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर नोंद घेऊन वनविभागाने तातडीने पावले उचलावी, आणि बिबट्याचा ठोस बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी फोंडावासीयांकडून होत आहे.
फोंडाघाट, हवेलीनगर भागात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By सुधीर राणे | Published: October 06, 2023 3:29 PM