अनंत जाधव सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सार्ताडा येथे बिबट्याच्या बछड्याला दोरीने बांधून त्याची छेडछाड केल्याचा प्रकार पुढे आल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार आठवड्यापूर्वी घडला आहे. मात्र, गुरूवारी याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त करत सबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. वनविभागानेही वन्यप्राणी अधिनियमांन्वये संबंधित ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन अधिकाऱ्यांचे पथकही नियुक्त करण्यात आले आहे.
आठवड्यापूर्वी सातार्डा येथील एका घराच्या अंगणात बिबट्याचा बछडा आला होता. त्या बछाड्याला स्थानिकांनी दोरीने बांधून घातले. त्यानंतर काही काळ त्याला अंगणात खेळवले. त्यातील एकाने तर बछड्याला मानेला धरून उचललेही. त्यानंतर या बछड्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाने या बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेऊन पशु वैद्यकीय उपचारांसाठी सावंतवाडीत आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीनी या बिबट्याच्या पायाला जखम झाल्याने त्याच्यावर दोन दिवस उपचार केले. त्यानंतर त्यास वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने या बछड्यावर उपचार करून त्याला जंगलातही सोडले. पण, बिबट्याला जंगलात सोडून अवघे चार दिवस होत नाहीत, तोच ज्या दिवशी सातार्डा येथे बिबट्याच्या बछड्याला पकडले, त्या दिवशीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Video-सावंतवाडीत बिबट्याच्या बछड्याचा अमानुष छळ, प्राणी मित्रांना संताप अनावर
वन्यप्रेमींनी हा व्हिडिओ गुरूवारी मिळाल्यानंतर बघून संताप व्यक्त केला. तसेच या बछड्याची ज्यांनी अहवेलना केली, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने राज्यभरातून वन्यप्रेमींनीही संताप व्यक्त केला होता. तसेच संबंधित ग्रामस्थांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी सिंधुदुर्गचे उपवनरंक्षक समाधान चव्हाण यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे यांची नियुक्ती केली आहे. वन्यप्राणी अधिनियम 1972 अन्वये वन्य प्राण्याची छेडछाड करणे तसेच प्राण्याला इजा पोहचेल असे काम करणे आदी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सध्या तरी अज्ञात व्यक्तीविरोधात असून, चौकशीत नावे निष्पन्न होतील तसे गुन्हे दाखल होतील, असे उपवनसंरक्षक चव्हाण यांनी सांगितले.
बिबट्याचा बछडा सुरक्षित : समाधान चव्हाणआठवड्यापूर्वी बिबट्याचा बछडा सार्ताडा येथे आला होता. एका कुटुंबाच्या अंगणात आला असता, घरातील सदस्यांनी त्याला बाधून घातले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनविभागाने सावंतवाडीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्याची तपासणी केली. त्याच्या पायाला इजा झाल्याने दोन दिवस उपचारही केले आणि त्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले आहे. मात्र, हा व्हिडिओ दोन दिवसापासून व्हायरल झाला आहे. यावरून कारवाई सुरू आहे. पण, बिबट्याचा बछडा सुरक्षित आहे, असे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.