तळवडे (सिंधुदुर्ग) : मातोंड मिरिस्तेवाडी येथे बिबट्याच्या जीवघेण्या थराराने एकच खळबळ उडाली. येथील सावळ यांच्या बागेतील ऐन वृक्षाच्या शेंंड्यावर बसलेल्या बिबट्याला वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल आठ तासांच्या थरारक प्रयत्नाने खाली उतरविण्यात यश आले. मात्र, या प्रयत्नात तळवडे येथील युवक अविनाश आंगचेकर हा गंभीर जखमी झाला. बिबट्याला खाली उतरविण्यासाठी झाडावर चढून फांदी तोडत असताना बिबट्याने अचानकपणे या युवकावर उडी घेतली. या झटापटीत दोघेही सुमारे ८० फुटांवरून खाली कोसळले. दरम्यान, बिबट्याने सुखरूपपणे जंगलात धूम ठोकली. या युवकाला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत ााहिती अशी की, मातोंड मिरिस्तेवाडी परिसरात गेले दहा महिने बिबट्याची दहशत आहे. अनेक कुत्री तसेच गाई, म्हशी या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी यापूर्वी पडल्या आहेत. हाच बिबट्या आज, सोमवारी पहाटे भरवस्तीतील सावळ यांच्या बागेतील ऐनाच्या झाडावर चढून बसलेला ग्रामस्थ गजानन रेडकर यांना दिसला. त्यावेळी हा बिबट्या अगदी वीस ते पंचवीस फुटांवर होता. रेडकर यांनी परिसरातील ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ सावळ यांच्या बागेकडे जमू लागले. त्यामुळे बिबट्या चांगलाच बिथरला आणि झाडावर जाऊ लागला. दहा वाजण्याच्या सुमारास तो ऐनाच्या झाडाच्या शेंड्यावर म्हणजे तब्बल ८० फुटांवर जाऊन बसला. बर्याच उशिराने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले; पण जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. यावेळी ग्रामस्थ बिबट्यावर दगड तसेच अॅटमबॉम्बचा मारा करीत होते, तर काही ग्रामस्थ मोठमोठ्याने ओरडत असल्यामुळे बिबट्या शेंड्यावरून हलत नव्हता. अखेर साडेबारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तब्बल साडेपाच तासांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला. ग्रामस्थांनी वनअधिकार्यांचा चांगलाच हुर्यो उडविला. मात्र, एक वाजण्याच्या सुमारास प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी सूत्रे हाती घेत बिबट्या ज्या झाडावर होता, त्या झाडाला लांब दोरी बांधण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने ते झाड हलविण्यात आले; पण बिबट्या झाडाच्या फांद्यांत जाऊन बसला होता. त्यामुळे तो हलवून खाली येत नव्हता. अखेर तळवडे येथील युवक अविनाश आंगचेकर याने झाडावर चढून ज्या फांदीवर बिबट्या बसला होता, तीच फांदी तोडण्याचा निर्णय घेतला. अविनाश फांदीवर चढून दोन घाव घालतो न घालतो तोच बिबट्याने त्याच्यावरच झेप घेतली. ही झेप एवढी जबरदस्त होती की, बिबट्यासह अविनाशही खाली कोसळला. तब्बल ८० फुटांवरून तो खाली कोसळला. खाली पडताच बिबट्या जंगलात पळून गेला. या घटनेत अविनाश गंभीर जखमी झाला आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल आठ तास चाललेला हा थरार अखेर पावणेदोनच्या सुमारास संपला. यावेळी या परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
मातोंडमध्ये बिबट्याचा थरार
By admin | Published: May 27, 2014 1:10 AM