सावंतवाडी : गोवा-बांबोळी रुग्णालयात परप्रांतीय रुग्णांकडून फी आकारणी सुरू केल्याने दोडामार्ग तालुक्यात जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची भेट घेतली व यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी आपण याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग भाजपच्या या शिष्टमंडळात माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर, चंदू मळीक, रंगनाथ गवस, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, आनंद नेवगी, सुधीर दळवी, बाळा नाईक, नगरसेवक चेतन चव्हाण आदींचा समावेश होता.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खास आपल्या भेटीसाठी पाठविले आहे, असे गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना सांगितले. दोडामार्गमध्ये सध्या जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. हे सर्व गोव्यातील बांबोळी रुग्णालयातील मोफत सुविधा बंद केल्याने झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या. तुमच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गवासीयांना दिलासा मिळेल, असे सांगितले. मात्र उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी यावर मी स्वत: निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगितले. याबाबत दोन दिवसांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करणार आहे. ते सध्या आजारी असल्याने अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्याशी याबाबत बोलणे झाल्यावर काय तो निर्णय घेतला जाईल. यासाठी मला दोन दिवसांचा कालावधी द्या. मी याबाबत तुम्हांला भूमिका कळवितो, असे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी शिष्टमंडळाला सांगितले.जनआक्रोशचे आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठामगोव्यात झालेल्या चर्चेबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दोडामार्ग येथे येऊन तशी भूमिकाही स्पष्ट केली. पण जनआक्रोशचे आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.भाजपच्या शिष्टमंडळाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची भेट घेतली. यावेळी राजन तेली, राजन म्हापसेकर, आनंद नेवगी, चंदू मळीक आदी उपस्थित होते.