सिंधुदुर्ग: जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करुया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण समारोहाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस, शिक्षणाधिकारी प्राथमिक आंबोकर, आमदार वैभव नाईक, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 कोटी रुपयांचा तातडीचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यात आली असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणखी शासकीय मदत मिळणार आहे. जिल्ह्याची स्वतःची आपत्ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक बोट, त्याची वाहतूक करण्यासाठी एक वाहन आणि प्रशिक्षित टीम देण्यात येणार आहे.
कलम 370 रद्द करुन काश्मिरी जनतेला रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करुन एक राष्ट्र एक घटना या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांना चालना दिल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांदा ते बांदा या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो. तसेच जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड या सारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यात कुक्कुट पालन, गायी पालन, शेळी पालन या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रति वर्षी एक लाख रुपयांचे उप्तन्न मिळेल असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की यासाठी नेमण्यात आलेल्या इंटिग्रेटरसोबतचा करार पूर्ण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामिण भागात चारशे आठरा किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यातील 34 कामे पूर्ण झाली आहे. तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेची जिल्ह्यातील 6 कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाचा आढावा घेतला व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर सिंधुदुर्गातील भारत स्काऊट आणि गाईड्सच्या सुवर्णबाण प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभादांडा नवाबाद 1 कब आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातोंड वरचे बांबर 1 बुलबुल यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यश प्राप्त केलेल्या आशिष झाट्ये, जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण यास गौरविण्यात आले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या स्नेहल केशल पाटील, परीस प्रसाद कुबल, प्रणव रघुनाथ कामत, अंबर नागेश गावाडे, ऋग्वेद आशिष प्रभू यांना गौरवण्यात आले. तर रायफल शुटिंगमध्ये पुरस्कार मिळवलेल्या तनया रामचंद्र वाडकरचाही गौरव करण्यात आला.
नक्षलग्रस्त भागातील विशेष कामगिरीबद्दल बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल दत्तू जाधव, वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि. दत्तात्र्येय गोपाळराव बाकारे, मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सचिन दशरथ पाटील, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमिक भिकाजी गोते आणि विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिवाजी बनकर यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
पूरपरिस्थितीमध्ये बचाव कार्य करणाऱ्यांचाही पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यामध्ये बापार्डे देवगड येथील धुरी, वैभववाडी येथील सह्याद्री जीवरक्षक सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते, कुडाळ येथील प्रवीण सुलोकर, शुभम राठीवडेकर, मालवण येथील स्कुबा डायव्हींग टीम व सांगेली येथील येथील बाबल अल्मेडा, बांदा येथील मंदार कल्याणकर, शेर्ले येथील जगन्नाथ धुरी यांना गौरवण्यात आले.