कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न' या अभियानाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले आहे. ऑक्टोबर महिन्यात १ ते १२ ऑक्टोबर पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती या अभियानाचे निरीक्षक व शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा कोणीही करू देत. या लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील विजय आमचाच होणार असा दावा खोत यांनी केला. कणकवली येथील विजय भवन मध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते. खोत म्हणाले, काळा पैसा भारतात आणणे, परदेशात पैसा घेऊन पळालेल्या काहींना भारतात परत आणणे यासह आधार लिंक करा, बँकेत पैसे जमा होतील, पॅन कार्ड लिंक करा, मग अनुदान जमा होईल अशी अनेक कामे करायला लावत जनतेच्या तोंडाला भाजप सरकारने पाने पुसली आहेत. याचा जाब विचारला जाणार असून या अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या लोकांना परत तुम्ही निवडून देणार आहात का? असा देखील प्रश्न विचारला जाणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे प्राबल्य आहे. त्यामुळे लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदार संघावर देखील आम्ही विजय मिळवणार आहोत. असा दावा त्यांनी केला. मात्र, कणकवली मतदार संघात उमेदवार कोण? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळत पक्षप्रमुख त्याबाबत निर्णय घेतील असे सांगितले.
लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात विजय आमचाच, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला दावा
By सुधीर राणे | Published: September 26, 2023 5:12 PM