प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वेंगुर्ले नगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. यापुढे पावसाळ्यापर्यंत तलावातील पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील कालावधीत पाणी कपातीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यातरी शहरात पाणीटंचाईची शक्यता नाही. वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत निशाण तलावातून शहरातील नागरिकांना दररोज ७ लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या ३० ते ४५ दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल एवढाच पाणीसाठा तलावामध्ये उपलब्ध आहे. शहरात ११०० नळ कनेक्शनधारक असून, ६२ सार्वजनिक शौचालयांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील बाजारपेठ, दाभोसवाडा, बंदर, किनळणे-भटवाडी या भागातील बहुतांशी नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील इतर भागात सार्वजनिक व वैयक्तिक विहिरींची संख्या जास्त आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहरातून जाणाऱ्या ओहळांवर ठिकठिकाणी नागरिकांनी नगर परिषदेच्या सहाय्याने बंधारे घातले असल्याने या विहिरींची पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. बाजारपेठेतील नळ कनेक्शनवर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांना या पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या दिवशी पाणी कपात असेल, त्यादिवशी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. कित्येक वर्षे शहरातील नारायण तलावाची दुरवस्था आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा निशाण तलावावर अवलंबून आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरवासीयांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते. नारायण तलावा संदर्भात नगर परिषदेकडून वेळोवेळी डागडुजीबाबत चर्चा, प्रस्ताव आदी सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. नारायण तलाव सुस्थितीत केल्यास शहराला कायमस्वरुपी मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी काटकसरीने वापरा : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले... निशाण तलावातून वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा केला जातो. या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असून, त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. आत्तापासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.
‘निशाण’ची पातळी खालावली
By admin | Published: February 28, 2016 12:56 AM